Uddhav Thackery, Dharavi Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Morcha : उद्धव ठाकरेंच्या 'धारावी बचाव' मोर्चाला सुरुवात

Adani Dharavi Rehabilitation Project : धारावी टी जंक्शन ते बीकेसीतील अदानी कार्यालयापर्यंत मोर्चा

Avinash Chandane

'धारावी बचाव, अदानी हटाव' अशा घोषणा देत धारावीच्या टी जंक्शनपासून अदानींच्या बीकेसी कार्यालयापर्यंतच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने हा मोर्चा काढला असून बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चात धारावीकरांसह मुंबईतील विविध भागातून लोक सहभागी झाले आहेत. आज जी वेळ धारावीकरांवर आली आहे, ती वेळ आमच्यावर येऊ शकते, असे मोर्चात सहभागी लोक सांगत आहेत.

धारावीच्या पुनर्वसनाचे कंत्राट उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी प्रॉपर्टीज या कंपनीला मिळाली आहे. 600 एकरवरील धारावीचा पुनर्विकास करताना टीडीआरचे हक्क अदानींना देण्यात आले आहेत, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. बीडीडी चाळींप्रमाणे धारावीचा विकास करा शिवाय सर्व धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर द्यावे, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

मुंबई भांडवलदारांच्या घशात नको - राऊत

टीडीआर हा महत्त्वाचा मुद्दा असून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा आणि अदानींना मुंबईचे मालक करण्याचा डाव आहे, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे

दरम्यान, धारावी टी जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चात आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब यांच्यासह इतर आमदार आणि नेते सहभागी झाले आहेत. शिवाय काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचेही (शरद पवार गट) कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सर्व पार्श्वभूमीवर बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मोर्चातही कुठलीही गडबड होऊ नये म्हणून भला मोठा फौजफाटा तैनात आहे. बीकेसीच्या फटाका मैदानात मोर्चाचे सभेत रुपांतर होईल.

मोर्चाची वेळ

मोर्चाची वेळ दुपारी 3 वाजता होती. उद्धव ठाकरे धारावीच्या टी जंक्शनजवळ दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पोहचले. त्यानंतर 5 मिनिटांत मोर्चाला सुरुवात झाली.

धारावीची खासीयत

जवळपास 600 एकरवर धारावी वसली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही धारावीची खरी ओळख आहे. धारावीत 60 हजारांहून अधिक झोपड्या असून त्यात 10 लाखांहून अधिक लोक राहतात. शिवाय धारावीत 13 हजारांहून अधिक लघु उद्योग आहेत. लघु उद्योगांतून धारावीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. धारावी हे उद्योगनगर म्हणूनही ओळखले जाते.

(Edited by - Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT