मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना देशातही सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. हा विषाणु पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. त्यानंतर जगभरात अनेक देशांमध्ये रुग्ण आढळू लागले आहेत. भारतात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात हजार रुग्ण आले आहेत.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. मुंबईत 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून सुमारे एक हजार प्रवासी आले आहेत. या सर्वांचा शोध घेतला जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची व आवश्यकता भासल्यास कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईत दक्षता घेतली जात आहे.
यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांची लसीकरण प्रमाणपत्रे किंवा आरटीपीसीआर चाचणी असली तरीही त्यांची पुनः तपासणी करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेऊन त्यापैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचा नमुना जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी पाठविला जाईल.
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाईल. सर्व जंबो कोविड केंद्रांची पुन्हा तपासणी करण्यात येईल.
औषधांचा साठा, मनुष्यबळ, वैद्यकीय प्राणवायूचे उत्पादन व साठा, विद्युत आणि अग्निशमन यंत्रणा यांचा आढावा घेतला जाणार. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाईल. जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी करण्यात येईल. याचप्रमाणे या बैठकीत मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एक प्रवासीही पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारनेही (Maharashtra Government) प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीमध्ये आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. जनुकीय तपासणीसाठी या रुग्णाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही आज चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका अलर्ट झाली आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.