Namaz
Namaz Sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंच्या इशाऱ्याचा धसका; मशिदींना पोलिसांचे कवच अन् भोंग्याविना अजान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता आजपासून राज्यभरातील मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होवू नये म्हणून सर्व मशिदींबाहेर आणि त्यातही विशेषतः संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर काही मशिदींबाहेर भोंग्याविनाच अजान पार पडली.

भांडुपमधीस सोनापूर परिसरातील जामा मस्जिद बाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी स्वतः सहाय्यक पोलिस आयुक्त डोळ्यात तेल घालून उभे आहेत. सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी पहाटेपासून शहरांतील वातावरणाचा अंदाज घेत आहेत. या दरम्यान आज मुंबईतील अनेक मशिदींमध्ये पहिली अजाण ही लाऊडस्पीकरशिवाय देण्यात आली आहे.

मुंब्रामधील देखील पहाटेची पहिली आजन शांततेत पार पडली. मुंब्रा भागात जामा आणि दारूअल फलाह या दोन मोठ्या मशिदी आहेत. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. मशिदीमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात सकाळचे नमाज पठण करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आहे. मुंब्रामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर, मुंब्रा स्थानकाबाहेर, छोट्या मोठ्या सर्व मशिदीवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या सर्व परिस्थितीवर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, आज ज्या मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले, त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला. माहिम मशिदीकडे मनसैनिक गेले, पण तिथे अजाण भोंग्याविना पार पडली. त्यामुळे तिथे हनुमान चालीसा वाजली नाही, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT