MVA NEWS
MVA NEWS Sarkarnama
मुंबई

MVA News : कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग,पवारांनी बोलावली आघाडीची तातडीची बैठक

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला तर भाजपवर दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. या विजयानंतर आता काँग्रेससह विरोधकांना मोठं बळ मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्टातल्या राजकीय हालचालींनाही मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकातील निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आज (दि.१४) महाविकास आघाडीची तातडीची बैठक बोलावली आहे. पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला आघाडीचे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा? यावर महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) च्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांत महाविकास आघाडीत विविध मुद्द्यांवरुन खटके उडाल्याचं समोर आलं आहे. यात मुख्यमंत्रीपदावरील राष्ट्रवादीचा दावे प्रतिदावे, अजित पवारांचा भाजप प्रवेशाच्या चर्चा, नाना पटोलें(Nana Patole)चा राजीनामा ,शरद पवारांची ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपद कार्यभार, राजीनाम्यावरचं भाष्य, अजित पवार राऊतांमधील संघर्ष,वज्रमूठ सभेतील खुर्चीचा वाद, काँग्रेसच्या पटोलेंचा स्वबळाचा नारा यांसारख्या अनेक मुद्द्यांवरुन आघाडीत सारंकाही आलबेल नसल्याचं लपून राहिलेलं नाही. आगामी काळातील निवडणुकीत फटका बसब नये म्हणून आघाडीतील एकजुटीसाठी पवारांनी या बैठकीच्या माध्यमातून पहिलं पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे.

आगामी निवडणुकांसाठी रणनीती...?

महाराष्ट्रात पवारांच्याच पुढाकारानं २०१९ ला अस्तित्वात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग जबरदस्त यशस्वी ठरला होता. अनेक मतभेद, एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप, कुरघोडीच्या राजकारणानंतर बऱ्याचदा आघाडीच्या भवितव्यावर सातत्यानं शंका उपस्थित केली जाते. पण तरीदेखील आघाडी भक्कम असल्याचा दावा आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींकडून केला जात आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे 10 महिने राहिले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास तयारी सुरू केली आहे. जागा वाटपातील संभाव्य मतभेदांमुळे महाविकास आघाडीत फूट पडून त्याचा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना निवडणुकीत फायदा होऊ नये यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीचे नेते सावध आहेत असंही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी पवारांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीवर भाष्य केलं आहे. यावेळी राऊत म्हणाले, आजच्या बैठकीत 2024च्या दृष्टीने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती काय असेल? जागा वाटपाचं सूत्रं, मोर्चेबांधणी,रणनीती याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक तो झांकी है पुरा महाराष्ट्र नही, पुरा देश बाकी है. महाराष्ट्र हे लुटीचं राज्य आहे. फार काळ त्यांच्याकडे राहणार नाही. जे कर्नाटकात झालं. तेच महाराष्ट्रात होईल असं भाकितही राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT