Rajni Patil sarkarnama
मुंबई

रजनी पाटील यांचा अर्ज भरताना रंगली एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीची चर्चा

ही निवडणूक जिंकूनच जबाबदारी पार पाडेन : रजनी पाटील

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही; तर काँग्रेसचे बहुतांशी नेते, मंत्र्यांनी वेळेत हजेरी लावून 'एकी' दाखविली; परिणामी, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेचा एकही नेता दिसत नसल्याने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या कपाळावर आट्या आल्या. 'शिवसेना' कुठे आहे, अशी चर्चा रंगत असतानाच शिवसेनेचे नेते, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची विधानभवात 'एन्ट्री' झाली! त्यानंतर रजनीताईंना पुन्हा निवडणूक कार्यालयात जाऊन शिंदेसोबत 'फोटोसेशन' करूनच बाहेर पडावे लागले. उशिराने का होईना पण शिंदे आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकले. 'महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि ही निवडणूक आम्हीच जिंकू' असा विश्वास देत शिंदे विधानभवनाच्या आवारातून 'एक्झिट' झाले. (Mahavikas Aghadi Leaders came together for filling nomination of Rajani Patil)

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या चार ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या पाटील यांनी बुधवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यासाठी दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे अन्य मंत्री, आमदार आणि विधानभवनात उपस्थितीत होते. तेव्हाच. दुपारी १ वाजता पाटील यांच्यासह अजितदादा, पटोले, थोरात निवडणूक कार्यालयात गेले.

ही मंडळी कार्यालयाबाहेर आली. तेवढ्यात पाटील यांना शुभेच्छा देऊन अजितदादा निघालेही. त्यानंतर शिवसेनेचा कोणीच नसल्याकडेच साऱ्याचे लक्ष होते. तेवढ्यात, एकनाथ शिंदे येत असल्याचा निरोप आला; त्यामुळे पाटील आणि अन्य काँग्रेस नेते कार्यालयाबाहेर थांबले. त्यानंतच्या एक-दोन मिनिटांत शिंदे आले, पाटील, थोरात यांच्यासह कार्यालयात गेले. पाटील म्हणाल्या, “काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी देऊन जबाबदारी सोपविली आहे. ही निवडणूक जिंकूनच जबाबदारी पार पाडेन." थोरात म्हणाले, 'एखाद्या सदस्याच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवार नसतो; ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही निवडणूक बिनविरोधी व्हावी, यासाठी भाजपला विनंती करणार आहोत.'

पक्षीय बलाबल

शिवसेना – 56

राष्ट्रवादी काँग्रेस – 53

काँग्रेस – 43

भारतीय जनता पक्ष – 106

बहुजन विकास आघाडी – 3 (भाजपसोबत)

समाजवादी पक्ष – 2 (आघाडीसोबत)

एम आय एम – 2 (आघाडीसोबत जातील)

प्रहार जनशक्ती – 2 (आघाडीसोबत)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1 (भाजपसोबत जातील)

सीपीआय (एम) – 1 (सहसा मतदान करत नाही)

शेतकरी कामगार पक्ष – 1 (आघाडीसोबत)

स्वाभिमानी पक्ष – 1 (आघाडीसोबत जातील)

राष्ट्रीय समाज पक्ष – 1 (भाजपसोबत)

जनसुराज्य शक्ती पक्ष – 1 (भाजपसोबत)

क्रांतिकारी समाज पक्ष – 1 (आघाडीसोबत)

अपक्ष – 13

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT