sharad pawar, ajit pawar sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Interview: पवारसाहेबांनी तुमची सतत फसवणूक केली का? अजितदादा म्हणाले...

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून आणि चिन्हावर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक. निवडणुकीला सामोरे जाताना उपस्थित झालेल्या पक्षफुटीपासून बारामतीच्या उमेदवारीपर्यंत आणि पक्षात झालेल्या अन्यायापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुलाखत.

सरकारनामा ब्यूरो

विजय चोरमारे

Q:२०१९ नंतर पवारसाहेबांनी तुमची आणि तुमच्या सहकाऱ्यांची सतत फसवणूक केली असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

A-फसवणूक नाही. पक्षाच्या स्थापनेपासून ते म्हणतील ते आम्ही ऐकत आलोय. आज ते आम्हाला म्हणतात हे मोदी साहेबांबरोबर गेले. मला सांगा, शिवसेनेबरोबर आम्ही २०१९ ला गेलो आणि अडीच वर्षे कारभार केला. शिवसेनेबरोबर गेलेले चालते आणि मग भाजपबरोबर का चालत नाही ? आम्ही नंतरच्या काळामध्ये काही भूमिका घेतली. लोकशाहीत बहुमताचा आदर करायचा असतो. तो आदर केला गेला नाही. आमच्यातले काही विरोधक म्हणतात दादांना संधी कुणी दिली? प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असते. साहेबांनाही यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून सदुसष्टला ते आमदार होऊ शकले. २०१४ ला आठवतेय का, भाजपला बाहेरून पाठिंबा आम्ही निवडून येऊन तिथे पोहोचायच्या आधीच दिला. पुढेही तसे प्रयत्न झाले. त्या अनेक बैठकीचा मी साक्षीदार होतो. म्हणून मी देवेंद्रजींच्या बरोबर सरकार केले.

Q: तुम्ही भाजपसोबत गेलात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलात. हा बाहेर पडण्याचा नेमका असा पॉइंट कुठला होता?

A- मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून १९९९ ला स्थापन झाला. त्यावेळेस जो पक्ष होता, जो झेंडा होता, जे चिन्ह होते, तेच आज आम्हाला मिळालेले आहे. लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो. ८० टक्के आमदार, जवळपास ६०-७० टक्के जिल्हाध्यक्ष, लाखो ॲफिडेव्हिटस् हे सगळे आम्ही आयोगाला दाखवले. आम्ही मूळ पक्षात आहोत. समोरच्यांनी वेगळा पक्ष काढलाय. वेगळे चिन्ह घेतलेय. अर्थात आमच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मॅटर चालू आहे. त्यामुळे पक्षातून आम्ही बाहेर पडलो, हे तुमचे म्हणणे धादांत खोटे आहे.

Q:तुम्ही शरद पवार यांच्यापासून वेगळे झालो म्हणूया. त्यामागे तुम्ही आणि तुमच्या सहका-यांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असल्याची टीका होते...

A- चर्चा काहीपण होत असते. त्याच्यात नखाएवढेदेखील सत्य नाही. माझ्या चौकशा मागेच झाल्या होत्या. उद्धव ठाकरेसाहेब मुख्यमंत्री असतानाच एओब्ल्यूची क्लिनचीट मला मिळाली होती. परंतु पुन्हा त्याचा तपास करायला सूचना दिल्या गेल्या. पुन्हा चौकशी झाली. पुन्हा एओडब्ल्यूने क्लिनचीट दिली. त्याच्यामुळे या आरोपात काहीच तथ्य नाही. १९९९ मध्ये ज्या कारणाकरिता साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले, त्या कारणाचा काही न विचार करता, ऑक्टोबरमध्ये त्या सोनियाजींच्याच पक्षाबरोबर सरकार केले. हे कसं झाले ? तेव्हा कुठे गेला परकीय जन्माचा मुद्दा? मागेदेखील पुलोद सरकार बरखास्त केले इंदिराजींनी. त्यावेळेस विचारले होते तुम्ही येता का असेच्या असे सरकार मी कंटिन्यू करते. काँग्रेसमध्ये या. नाही म्हटले, बरखास्त केले. पुढे ८५ ला निवडणुका झाल्या. पुन्हा पुलोद पडले. पडल्यानंतर लक्षात आले की किती दिवस विरोधी पक्षात राहायचे? मग पुन्हा काँग्रेसमध्ये १९८६ ला विलिनीकरण केले.

Q:तुम्हाला विधिमंडळ पक्षातून मोठे समर्थन आहे. म्हणजे आमदारांच्या आग्रहामुळे तुम्हाला विरोधी पक्षनेता केले. तुम्ही आता ‘राष्ट्रवादी’मध्ये असताना वेगळा निर्णय घेतला. बहुतेक आमदार बरोबर आले. पण हे इतके समर्थन असताना २०१९ ला काय गडबड झाली, नेमकी? पहाटेच्या शपथविधीवेळी...

A- विधानसभेच्या अध्यक्षपदाचे गुप्त मतदान होते. परंतु सर्वोच्च्च न्यायालयात मॅटर नेऊन, तिकडून त्यांनी सांगितले, हात वर करून, आवाजी मतदानाने ते करा. आणि त्यामुळे मला काही कुणाला उघडे पाडायचे नव्हते. मी नंतर सांगितलं की आपले ठरले होते गुप्त मतदानाने, ते झाले नाही. त्यामुळं मी राजीनामा देतो. मी राजीनामा दिला. आणि देवेंद्रजींनी पण दिला. आणि पुढचा इतिहास आपल्याला पण माहिती आहे.

Q:शिवसेना फुटल्यानंतर जी भाषणे झाली, त्या भाषणात तुम्ही असे म्हणाला होता की, अरे असे कसे बाहेर पडतात तुम्ही. तो ठाकरेंचा पक्ष आहे. तुम्हाला जर जायचे होते तर स्वतंत्र पक्ष काढायचा होता. पण तुम्हीसुद्धा त्याच वाटेने गेलात.

A- असा विचार अजिबात आलेला नव्हता. विचार येण्याचे काडीचे कारण नाही. मला दोन, एक मेच्या आधी बोलावलेले होते सिल्व्हर ओकला. तिथे साहेब होते. काकी होत्या. सुप्रिया होती, मी होतो. एका टेबलवर. तिथे सांगितले की, आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतलाय, साहेबांनी राजीनामा द्यायचा. साहेबांनी आता फक्त राहिलेल्या संस्था बघायच्या. आणि तुम्ही लोकांनी तो पक्ष चालवायचा. आणि त्यांनी राजीनामा दिला, हे मी खोटं बोलत नाही. उभ्या महाराष्ट्रानं बघितलयं. परंतु राजीनामा दिल्यानंतर काही लोकांना तिथे बोलावले. त्याच्यामध्ये दोन लोकांना बोलावलं. एकाचं नाव मी घेत नाही. कारण, तो म्हणेल आज, मला बोलावलेच नाही. परंतु त्याच्यात आनंद परांजपेपण होते. अन् त्या दोघांना सांगितलं की, इथं बाहेर दोन दिवस आता घोषणा द्या, राजीनामा मागे घ्या, राजीनामा मागे घ्या. मग दोन दिवसांनी मी राजीनामा मागे घेईन. हे असलं मला अजिबात आवडत नाही. कितीदा, कितीदा... वेगवेगळ्या घटनेला आम्ही सामोरे जायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT