People celebrate Ambedkar Jayanti with grand processions and cultural events, highlighting Dr. Babasaheb Ambedkar’s legacy and social impact. Sarkarnama
मुंबई

Ambedkar Jayanti 2026 : 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणं...'; राज ठाकरेंनी आंबेडकर जयंतीदिनी टोचले कान

Raj Thackeray on Ambedkar Jayanti 2026 : 'आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे. त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात.'

Jagdish Patil

Mumbai News, 14 Apr : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी आज पहाटेपासून बाबासाहेबांना अभिवादन करायला सुरुवात केली आहे.

मात्र, काही ठिकाणी जंयतींच्या नावाखाली मोठमोठे डीजे लावून केवळ धिंगाणा घातला जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा गोरव करत त्यांचे विचार जोपासण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.

पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे. त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं.

यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते, असं राज यांनी म्हटलं आहे.

तर याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो.

नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापीपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू, असंही परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे.

आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे, बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन, अशा शब्दात राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT