मुंबई : अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (NCB) मुंबईच्या विभागीय संचालकपदी IRS अमित फक्कड गवाटे (Amit Gawate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याआधी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडे ही जबाबदारी होती. पण त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिली. त्यामुळे 31 डिसेंबर 2021 नंतर त्यांना त्यांच्या मुळ विभागात पाठवण्यात आले. विशेष म्हणजे गवाटे यांनीही मुंबई एनसीबीत वानखेडे यांच्यासोबत काही काळ काम केले आहे. (Mumbai NCB Latest News Updates)
गवाटे हे 2008 च्या तुकडीचे आयआरएस अधिकारी आहेत. जुलै 2020 मध्ये त्यांची एनसीबीमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवस ते मुंबई एनसीबीमध्ये कार्यरत होते. त्याचवेळी समीर वानखेडे यांचीही एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या भावावर अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने कारवाई केली होती.
हे प्रकरण देशभरात गाजले होते. त्यावेळी गवाटे हेही काही काळ एनसीबीमध्ये उपसंचालक पदावर कार्यरत होते. त्यामुळे हे प्रकरण त्यांनी अत्यंत जवळून हाताळले. या प्रकरणात रियाला अटकही करण्यात आली होती. पण यादरम्यान गवाटे यांची बेंगलुरू एनसीबीच्या विभागीय संचालकपदी बदली झाली. त्यांच्याकडे चेन्नई एनसीबीचाही अतिरिक्त कार्यभार होता. त्याठिकाणी त्यांनी जवळपास दीड वर्ष काम केले आहे.
बेंगलुरू आणि चेन्नई एनसीबीनंतर आता गवाटे हे पुन्हा मुंबई एनसीबीमध्ये आले आहेत. याठिकाणी त्यांच्यावर अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची जबाबदारी असणार आहे. प्रामुख्याने अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs Party) प्रकरणी अटक झाली होती. हे प्रकरण देशात चांगलेच गाजले. वानखेडे यांच्यावर लाचखोरीचे, षडयंत्र रचल्याचे आरोप झाले.
या प्रकरणामुळे वानखेडे यांच्याकडून 31 डिसेंबर 2021 नंतर विभागीय संचालक पदावरून बदली करण्यात आली. आतापर्यंत दुसऱ्या अधिकाऱ्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यांच्याजागी आता गवाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणासह, मंत्री नवाब मलिक यांचे जावई आणि अनेक हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये त्यांचा कस लागणार आहे.
गवाटे येण्याआधीच दोन अधिकारी निलंबित
आर्यन खानला ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. आर्यनसह १९ जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आर्यन आणि इतर १७ जणांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणातील एक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता एनसीबीने आपल्याच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. अधीक्षक व्ही.व्ही. सिंग आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना निलंबित करण्यात आले. संशयास्पद हालचाली केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खानसह अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये हे तपास अधिकारी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.