मुंबई : शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरला या जागेवर मतदान जाहीर केले असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. शिवसेनेचे आमदार लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध होणार की भाजपा उमेदवार देणार हे येथे काही दिवसात स्पष्ट होईल.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना (Shivsena) आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे मे २०२२ मध्ये दुबईत कुटुंबियांसह फिरायला गेले होते. पण तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार रमेश लटके हे शिवसेनेचे सलग दोन वेळचे आमदार होते.
एखाद्या विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानुसार आजच निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजपने आपले उमदेवार आधीच जाहीर केले आहेत. पण या निवडणुकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार का, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावरही दावा केल्याने हा मुद्दा सध्या निवडणूक आयोगात आहे. त्यातच आता पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली असल्याने निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळणार याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. हा चिन्हाचा वाद लगेचच मिटण्याची शक्यता नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत शिवसेनेला कोणते निवडणूक चिन्ह मिळणार हा उत्सुकतेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.