Ashish Shelar, Uddhav Tackeray Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar News : 'आदित्य ठाकरेंची बालबुद्धी, तर..'; शेलारांनी मविआचं सर्वच काढलं

Maharashtra Politics : मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला महाविकास आघाडीने पाठ फिरवली. यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका, तर बैठकीला न जाण्याचा निरोप ज्याने दिला, त्याचे नाव जाहीर करणार असल्याचा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिला.

Pradeep Pendhare

Mumbai News : मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे. आदित्य ठाकरे यांचा आरक्षणाचा अभ्यास कच्चा असून, ते या विषयावर बालबुद्धीसारखे वागत आहेत, असा सणसणीत टोला शेलार यांनी ठाकरे यांना लगावला. तसेच बैठकीला न येण्याचा कोणी निरोप दिला, याचा खुलासा करावा अन्यथा आम्ही सभागृहात नाव जाहीर करू, असा इशारा देखील शेलार यांनी महाविकास आघाडीला दिला.

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरक्षणावर गंभीर नसल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे कोण खरं बोलतय तेच कळायला मार्ग नाही. भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याच मुद्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीला बैठकीला न येण्याचा निरोप कोणी दिला, याचे नाव जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्यथा आम्ही सभागृहात नाव जाहीर करू, असा इशारा दिला. आशिष शेलार यांच्या इशाऱ्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, याची चर्चा आहे. आशिष शेलार यांच्या इशाऱ्यावर विरोधक देखील आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना देखील यावेळी सुनावले. "आदित्य ठाकरे अभ्यासात कच्चे आहेत. आम्हीच आरक्षण सभागृहात मांडले. कायदा केला आणि हे त्यांनाच प्रश्न करत आहेत. आरक्षणासंदर्भात नेमकी तुमची भूमिका काय? आदित्य ठाकरे या सर्व विषयावर बालबुद्धीसारखे वागत आहेत", असा सणसणीत टोला आशिष शेलार यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दोन बैठका झाल्या, त्यात नेमके काय झाल ते सभागृहात सांगा, यावर आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेच या दोन्ही बैठकांना आले नव्हते. एक ते कोणाच्या बाजूने आहेत, ते त्यांनी सांगावे. मराठा मोर्चा आणि आरक्षण यांच्या बाजूने आहेत की, विरोधात हे स्पष्ट करावे.

आदित्य ठाकरे यांचा असली चेहरा कोणता आहे? जे बैठकीत आले नाहीत, तेच विचारात आहेत, बैठकीत काय झाले. त्या बैठकीला त्यांचे विरोधी पक्षनेते उपस्थित होते. ते जर त्यांना माहिती देत नसतील, तर कोणी कोणाचे कान उपटायचे, ते आदित्य ठाकरे यांनी ठरवावे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

वादाचा मुख्य मुद्दा आशिष शेलारांनी सांगितला

काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह त्यांच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) मित्रपक्षांच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भात लावलेल्या बैठकीला दांडी मारली. पाठ दाखवली का दाखवली? निमंत्रण देखील पोचले होते. सरकारकडून व्यक्तिगत चर्चा देखील झाली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांना येण्याची सोय करून देखील देण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर देखील विरोधकांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

मग प्रश्न उपस्थित होतो तो, माशी कुठे शिंकली. बैठकीला न जाण्याचा मेसेज कोणाचा आला. निरोप कोठे पोचला. या सगळ्यानंतर न येण्याची भूमिका घेतली, ती का? मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत जर महाविकास आघाडी संवेदनशील असते, तर त्या बैठकीला आले असते आणि समाजाची भूमिका मांडली असती, असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

महाविकास आघाडी डोळे बंद करून...

या बैठकीतून त्यांनी पळ काढला. त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. जो प्रश्न आम्हाला विरोधी पक्ष विचारतोय, तो इतका बालबुद्धीचा प्रश्न आहे. ज्या सरकारने 10 टक्के आरक्षणाचा प्रस्तावच सभागृहात मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी ते आरक्षण मिळवून दिले. पुढे ते न्यायालयात टिकले नाही. ज्यांच्यामुळे टिकले नाही, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. मराठा समाजाचं आरक्षण मांडले, दिले आणि आम्हीच टिकवले. समाजाच्या हिताच्या गोष्टीबाबत महाविकास आघाडी डोळे बंद करून आहेत, असा टोला देखील आशिष शेलार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT