Ashok Chavan Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan : मराठा आरक्षण बैठकीत अशोक चव्हाणांनी जरांगेंच्या भेटीतील मुद्यांवर दिला जोर...

Jagdish Pansare

Ashok Chavan News : मराठा आरक्षण प्रकरणावर काल मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत खासदार अशोक चव्हाण सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली, याच चर्चेत जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवर अशोक चव्हाण यांनी बैठकीत जोर दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठावाड्यातील शांतता संवाद रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 8 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीनंतर 13 रोजी स्थगित करण्यात आले होते. एक महिन्याची मुदत त्यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला दिली होती. ती आता संपत आली आहे, अशावेळी सरकारला काही ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यातून तोडगा निघाला नसला तरी अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेतील काही मुद्दे बैठकीत उपस्थित केले. मराठा आरक्षण प्रकरणी महायुती सरकारने आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक पक्षांचे नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार मी अनेक मुद्दे या बैठकीत उपस्थित केले. मराठा उमेदवार व विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने 28 जून रोजी निर्गमित केलेल्या शुद्धीपत्रकामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत स्पष्टता आणण्याची मागणी केली.

राज्य सरकारने मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण मंजूर करून सार्वजनिक आरोग्य, पोलिस, उर्जा आदी विभागासह राज्य लोकसेवा आयोगाच्या नोकरभरतीत तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत ते लागू केले आहे. मात्र, अद्यापही मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळालेच नसल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात असून, समाजाला अधिकाधिक लाभ देण्याच्या अनुषंगाने पावले उचलावीत, अशीही मागणी या बैठकीत केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आंदोलना दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू आहे. आजवर किती व नेमके कोणते गुन्हे मागे घेण्यात आले, याविषयी माहिती देण्याची तसेच गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही अधिक गतिमान करण्याची मागणी या प्रसंगी केली. या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाबाबत भूमिका व सूचना मांडण्याची संधी विरोधी पक्षांकडे होती. मात्र, महाविकास आघाडी या बैठकीला गैरहजर राहिल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT