मुंबई : अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर असे कलाकार मुख्य भूमिकेत असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनाचे आणि चित्रपटातील कलाकारांचे भरभरून कौतुक केले जात असताना या चित्रपटावरुन दोन गट पडले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी या चित्रपटावर आपलं मत मांडलं आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजच्या कार्यक्रमासाठी आले असताना नाना पाटेकरांनी या चित्रपटावर आपले मत व्यक्त केले. त्यावर भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी टि्वट केलं आहे.
''नाना, तुम्ही नाना पाटेकरच रहा उगाच नाना पटोले होऊ नका. सगळं छान सलोख्याने चाललं असतं तर हा चित्रपट बनवण्याची गरजच भासली नसती,'' असे भातखळकरांनी टि्वट करीत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
कार्यक्रमात नाना पाटेकर यांना 'द काश्मीर फाईल्स' बद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. 'एखाद्या चित्रपटावरून वाद निर्माण होण्याचे प्रकार वाईट आहेत. इथला हिंदू आणि मुस्लिम एक होता. आणि तो कायम एकत्रच राहायला हवा. यामध्ये दोन गट पडले असतील तर ते चुकीचं आहे असं म्हणावं लागेल. मी अजूनही हा चित्रपट पाहिलेला नाहीय. त्यामुळे याबद्दल आत्ताच मला सविस्तर बोलता येणार नाही'. असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
या चित्रपटासोबत झुंड, पावनखिंड हे चित्रपटही महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावेत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काश्मीर फाईल्स, झुंड,पावनखिंड हे चित्रपट टॅक्स फ्री करावेत ही लोकांची भावना आहे, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही तीच भावना आहे, असे सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे. एकीकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळत असला तरी दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
सध्या ‘द काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री पल्लवी जोशी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत आहेत. अनेक मान्यवरांना ते मागील काही दिवसांमध्ये भेटले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यासारख्या महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.