Atul Londhe Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

Atul Londhe Congress : नितेश राणेंची चिथावणीखोर भाषा भाजप अन् फडणवीसांना मान्य आहे का?

जयेश विनायकराव गावंडे

Devendra Fadnavis News : कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतात, चिथावणीखोर भाषण देतात, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलिस आपले काहीच वाकडं करू शकत नाहीत, असे थेट पोलिसांना आव्हान देतोय.

महाराष्ट्र पोलिसांमध्ये नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक नाही का? असा संतप्त सवाल करून राणेंवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

भाजप सरकारचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, आमदार नितेश राणेंची भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आहे. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे म्हणूनही सागर बंगल्यावरचा हा बॉस कान, डोळे बंद करून कुंभकर्णी झोप घेत आहे हे दिसते. सोलापूरच्या सभेत या नितेश राणेंनी भडकाऊ भाषण दिले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण कारवाई काहीच झाली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्यातील सभेतही आमदार नितेश राणेंनी गरळ ओकली. 'पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील, मी येथे आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणे मुश्कील होईल.' ही भाषा महिलांचा अपमान करणारी व थेट पोलिसांना आव्हान देणारी आहे.

भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितेश राणेची ही भाषा मान्य आहे का? सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? या गुंडाछाप दोन कवडीच्या आमदारावर कारवाई करताना शिंदे (Eknath Shinde) , फडणवीस (Devendra Fanavis) , अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या हाताला लकवा मारतो का? आमदार नितेश राणेंच्या भाषणावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी व त्यांना आवर घालण्याची हिंमत दाखवावी.

'भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मा. सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, परंतु भाजपच्या राज्यात कायदा तर धाब्यावर बसवलाच आहे, पण कोर्टालाही ते जुमानत नाहीत, हा सत्तेचा माज आहे. आमदार नितेश राणेवर (Nitesh Rane) कारवाई करू नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे हे आम्हाला माहीत आहे, मग पोलिसांच्या लाठ्या व कायदा हा फक्त विरोधकांवर का उगारता?

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सरकार येतात व जातात, परंतु पोलिस व प्रशासन यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले पाहिजे. “म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो” हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता (BJP) पक्षाने लक्षात ठेवावे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT