Sanjay Shirsat-Bharat Gogawle- Bachu Kadu
Sanjay Shirsat-Bharat Gogawle- Bachu Kadu Sarkarnama
मुंबई

बच्चू कडू, संजय शिरसाटांसह नाराज आमदारांना येणार 'अच्छे दिन'!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व खासदार, आमदार हे आसामच्या कामाख्या देवीचं दर्शन घेऊन परतल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चांना ऊधाण आले होते. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अखेर मुहूर्त मिळाला असून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी म्हणजे ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ( Shinde -Fadnavis government Latest News)

मागील काही महिन्यांपासून शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आठवडाभरात महत्त्वाची बैठक होऊ शकते. त्यापाठोपाठ हे दोन्ही नेते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांची भेट घेऊन विस्तार जाहीर करतील असे सांगण्यात येत आहे.

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ९ ऑगस्टला पहिला विस्तार करून त्यात, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या प्रत्येकी ९ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, शिवसेनेत बंड करताना शब्द देऊनही काही आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड झाली. अशा आमदारांची समजूत काढून, १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा विस्तार करण्याचे आश्वासन दोन्ही गटांकडून दिले होते.

प्रत्यक्षात आता नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत नव्या मंत्र्यांच्या समावेशाबाबत झालेला नाही. त्यामुळे विशेषतः शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत भर पडत असल्याची चर्चा आहे. या मुद्यावरून विरोधकही सरकारवर टीका-टिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी मिलन कार्यक्रमात फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारावर स्पष्टपणे बोलले होते.

मंत्रिपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग...

त्यानंतर, आता फडणवीस यांनी शिंदे याची भेट घेतली. त्यामुळे येत्या १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होणार असल्याचे मानले जात आहे. या फेरीत मंत्रिपदे मिळविण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. आता आमदार बच्चू कडू, संजय शिरसाट यांच्यासह भाजप आणि शिंदे गटातील नाराज आमदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT