Su Sarkarnama
मुंबई

Suresh Mhatre : भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या सुरेश म्हात्रेंची वर्णी लागणार?

Bhiwandi Loksabha News : महविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाला कुठून उमेदवारी द्यायची यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.

Bhagyashree Pradhan

Bhiwandi News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताना दिसत आहे. यातच महविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाला कुठून उमेदवारी द्यायची, यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्या 11 लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आली आहे, त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी दिली. दरम्यान, भिवंडी लोकसभा आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसकडे होता, त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेते, हे पाहणंदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे घटकपक्ष, तसेच महायुतीच्या घटकपक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. जागावाटपाच्या चर्चा, बैठकादेखील सुरू झाल्यात. काही जागांवर महायुतीच्या घटकपक्षांमध्ये, तसेच महाविकास आघाडीमध्ये घटकपक्षांमध्येदेखील रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा आघाडी सरकारच्या काळापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे, तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलाय. 2014 व 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा भाजपचे कपिल पाटील यांनी बाजी मारली.

कपिल पाटील हे सध्या केंद्रीय पंचायत राजमंत्री आहेत. महायुतीत ही जागा साहजिकच भाजपच्याच वाट्याला जाणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनेदेखील जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने 11 जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याला देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी दिली.

आता काँग्रेस याबाबत काय भूमिका घेते, हे पाहणेदेखील आता महत्त्वाचं ठरणार, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने या मतदारसंघात आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याचेदेखील बोलले जाते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले सुरेश म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचेदेखील बोलले जाते. सुरेश म्हात्रे यांनी 2014 मध्ये मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं. त्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हात्रे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतदेखील सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरेश म्हात्रे यांचा सत्कारदेखील करण्यात आला. याबाबत बोलताना भिवंडी लोकसभेचे प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी भिवंडी लोकसभेवर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीला मिळावी, अशा प्रकारचा ठराव केला. त्यानंतर शरद पवार यांनी ज्या अकरा जागा मागितल्या त्या 11 जागांमध्ये भिवंडी लोकसभादेखील आहे. ही लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीला मिळेल, अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे.

R...

SCROLL FOR NEXT