Bhiwandi Latest News: मुंबई महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा सुरू असतानाच आता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतही मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी ऊर्फ फरजाना सय्यद यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली असून, प्रभाग क्रमांक ४-अ मधील जागा रिक्त घोषित करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फरजाना अन्सारी या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडून आल्या होत्या. भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने १२ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांना अन्सारी जातीचे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र, ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर त्यांच्या नगरसेवकपदावर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला.
या प्रकरणाची सुरुवात समाजवादी पक्षाच्या पराभूत उमेदवार इरम अहमद हुसैन अन्सारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीतून झाली. फरजाना अन्सारी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार समितीने संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. शाळा सोडल्याच्या दाखल्यांवरील जात नोंदी, सादर करण्यात आलेले पुरावे आणि दक्षता पथकाचा अहवाल यांचा विचार केल्यानंतर प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय घेण्यात आला.
जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या आधारे महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १० (१)(अ) आणि जात प्रमाणपत्र पडताळणीसंबंधी कायद्यातील तरतुदींनुसार फरजाना अन्सारी यांना नगरसेवकपदासाठी अपात्र ठरवले. त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द मानण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ४-अ मधील जागा रिक्त घोषित केल्यानंतर आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभाग आणि संबंधित शासकीय कार्यालयांकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
फरजाना इरफान सय्यद ऊर्फ फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालय त्यांच्या याचिकेवर काय भूमिका घेते आणि त्यांना दिलासा मिळतो का, याकडे राजकीय नेत्यांसह भिवंडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.