Prime Minister Narendra Modi during the launch of Bihar Women Employment Scheme, transferring ₹10,000 to 75 lakh women’s bank accounts ahead of elections. Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : 'निवडणुकीच्या तोंडावर 'मतदार लाच योजना! पूरग्रस्तांना एक पैसा नाही पण बिहारसाठी एका तासात 7,500 कोटींचा निधी...', सामनातून PM मोदींवर हल्लाबोल

Bihar Women Employment Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.26) बिहारमधील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी 'बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'ची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत बिहारमधील तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात आले.

Jagdish Patil

Mumbai News, 27 Sep : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.26) बिहारमधील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी 'बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'ची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत बिहारमधील तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात आले. तर मोदी सरकारची ही योजना बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांची मते मिळवण्याठीचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

महिलांच्या खात्यात पैस जमा करून भाजप निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावर निवडणूक आयोग गप्प का? बिहारातील ही योजना दुसरे तिसरे काही नसून 'मतदार लाच योजना'च आहे. भारतीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांना झापडे बांधल्याचा परिणाम भारताला भोगावा लागत आहे. मतदार लाच योजनेचा प्रत्येक भारतीयाने धिक्कार करायला हवा, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारच्या या योजनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनामध्ये लिहिलं की, 'ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोदींनी 75 लाख महिलांच्या खात्यांत प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. बिहारातील साधारण एक कोटी महिलांनी भाजपला मतदान करावे यासाठीच ही योजना आणली. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा एक पैसा अद्याप मिळालेला नाही आणि बिहारात निवडणुका नजरेसमोर ठेवून महिलांना मोदी भ्रष्टाचार योजनेतून 10 हजार रुपये मिळाले आहेत.

पंतप्रधानांचा हा व्यवहार आर्थिक गुन्हेगारी स्वरूपाचा असून बिहारातील ही योजना दुसरे तिसरे काही नसून ‘मतदार लाच योजना’च आहे.' यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगावर देखील ठाकरेंच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे. निवडणूक आयोग म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे. संविधानिक पदांवर बसून निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश हे भाजपची चाकरी करत आहेत.

भाजपच्या ‘शाखा’ म्हणून या संविधानिक संस्था काम करत असतील तर देशातील निवडणुका हा केवळ एक फार्स ठरतो. बिहारातील विधानसभा निवडणूक भाजप-नितीश कुमार यांच्या युतीला आधी सहजसोपी वाटत होती. हरयाणा, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मते चोरी करून किंवा मते विकत घेऊन निवडणूक जिंकण्याचे त्यांचे मनसुबे राहुल गांधींनी धुळीस मिळवले. त्यामुळे सरकारी तिजोरीचा वापर करून मते विकत घेण्याची योजना पंतप्रधान मोदींनी आखली आहे.

बिहारातील 75 लाख महिलांच्या खात्यांत मोदी यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले व त्यासाठी बिहारच्या तिजोरीत एका तासात 7,500 कोटींचा निधी वळविण्यात आला. 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'च्या नावाखाली हा निधी देणे म्हणजे भाजपला मते देण्यासाठी दिलेली लाच आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या कररूपी पैशांतून दिलेली ही लाच म्हणजे आर्थिक अपराध आहे.

या पैशांतून महिलांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी सहाय्य मिळेल, अशी विशेष माहिती देण्यात आली. बिहारात पुढील दोन महिन्यांत निवडणुका होतील. तशी घोषणा होण्याच्या काही दिवस आधी ‘ही’ लाचखोरी मते विकत घेण्यासाठी झाली. भारतीय मतदारांना पैशांच्या अमलाखाली मतदान करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी उत्तेजन देत आहेत. याची दखल सगळ्यात आधी निवडणूक आयोगाने घ्यायला हवी होती.

सामुदायिक हत्याकांड व्हावे तसे हे सामुदायिक लाच प्रकरण आहे. निवडणुकीतील पारदर्शीपणा, निष्पक्षपणावरच त्यामुळे संशयाचे ढग निर्माण झाले. भारतीय मतदारांना विकत घेऊन लोकशाहीवर ताबा मिळवण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मूक संमतीने हे घडत आहे. भाजपची सत्ता प्रस्थापित झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सरकारी लाच देण्याचे प्रमाण वाढले आहे.

पंतप्रधान मोदी हे देशाला दिलेली अनेक आश्वासने पाळायला तयार नाहीत. ते जनतेला आत्मनिर्भरतेची प्रवचने देतात, पण मतदारांना आत्मनिर्भर करण्याऐवजी दुर्बल व पंगू बनवताना दिसतात. बिहारातील महिलांची मते विकत घेण्याचे ताजे प्रकरण त्याच प्रकारात मोडते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीआधी अशाच पद्धतीची 'लाडकी बहीण' योजना या मंडळींनी सुरू केली व महिलांच्या खात्यांवर प्रत्येकी 1500 रुपये जमा करून मते विकत घेतली.

या योजनेमुळे महाराष्ट्राचे आर्थिक गणित जास्तच कोलमडले व मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला राज्याच्या तिजोरीत दमड्याही उरल्या नाहीत. महिन्याला आम्ही 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देतो असे राज्याचे अर्थमंत्री रोज सांगतात, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीविषयी ते बोलत नाहीत.

बिहारातही आता तोच खेळखंडोबा सुरू आहे. बिहारातील साधारण एक कोटी महिलांनी भाजपला मतदान करावे यासाठीच ही योजना आणली. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा एक पैसा अद्यापि मिळालेला नाही आणि बिहारात निवडणुका नजरेसमोर ठेवून महिलांना मोदी भ्रष्टाचार योजनेतून 10 हजार रुपये मिळाले आहेत. ही सरकारी तिजोरीची लूट आहे, असं सामनात लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT