Youth NCP
Youth NCP Sarkarnama
मुंबई

युवक राष्ट्रवादीकडून 'एप्रिल फूल डे'च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सतत वाढणारी महागाई... इंधन दरवाढ... वाढती बेरोजगारी... ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेला आलेले ‘बुरे दिन’ यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्त्वाखाली 'एप्रिल फूल डे' चे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आजचा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून ओळखला जातो. एकमेकांची चेष्टा-मस्करी करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे.गेल्या सात वर्षात अनेक खोटी आश्‍वासने मोदी सरकारने दिली. त्यातील एकही आश्‍वासन प्रत्यक्षात आले नाही, असा आरोप यावेळी महेबूब शेख यांनी केला.

केंद्रसरकार ज्या ‘ईडी’च्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच मुंबईतील कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला.

या आंदोलनात प्रदेश युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमोल मातेले, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे, मोहसीन शेख, वीरू वाघमारे, गौतम आगा, सुनील पालवे, नाजीर शेख यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेसची युवक शाखा आक्रमक झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारशी दोन हात करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असा ठराव दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने ठराव केला होता. त्यावरून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT