anit corruption action against police in dharavi
anit corruption action against police in dharavi 
मुंबई

पोलिसांना बिर्याणी पडली महागात! : स्वतःच `खिमा` झाले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः धारावी पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीला बिर्याणी चांगलीच महाग पडली आहे. बिर्याणीची हातगाडी लावण्यासाठी, तसेच त्यावर कारवाई न करण्यासाठी 32 हजारांची लाच पोलिसांनी मागितली होती; मात्र तडजोडीनंतर 25 हजारांची लाच घेण्यास तयार झाले होते. याप्रकरणी दोन पोलिसांसह तिघांना अटक केली आहे.

पोलिस नाईक संजय तळेकर, पोलिस शिपाई मुकुंद शिंदे आणि केक विक्रेता प्रतीक मेहेर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक संदीप राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा मुंब्रा येथील रहिवासी असून, तो इस्टेट एंजट आहे; मात्र व्यवसायात मंदी असल्याने त्याने धारावी येथे बिर्याणी, पुलावची हातगाडी सुरू केली होती. एका व्यक्तीने त्याला धारावी पोलिस ठाण्यात भेटायला बोलावले आहे, असा निरोप दिला. त्यानुसार तक्रारदार धारावी पोलिस ठाण्यात संजय राणे यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ऑर्डर्ली मुकुंद शिंदे आणि संजय तळेकर यांना भेटले. यावेळी तिघांनी तक्रारदाराकडे गाडी लावण्याचे आणि त्यावर कारवाई न करण्यासाठी 32 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे 6 हजार, चार सहायक पोलिस निरीक्षकांचे 12 हजार, चार बिट मार्शलचे 5 हजार, चारचाकी गाडीचे 4 हजार आणि या तिघांचे 6 हजार असा हिशेब असल्याचा दावा केला. मात्र, तेथून निघाल्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय (एसीबी) गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा लावला. दरम्यान, धारावी पोलिस ठाण्यातील संदीप राणे याने तक्रारदाराला फोन करून गाडी कधी सुरू करणार असल्याची विचारणा केली. तसेच पोलिस ठाण्यासमोरील प्रतीक मेहेर या व्यक्तीकडे 25 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून 25 हजार रुपये घेताना मेहेर याच्यासह संजय तळेकर, मुकुंद शिदे यांना एसीबीने अटक केली. दरम्यान, संदीप राणे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT