BJP Demands Compensation For Mumbaikars 
मुंबई

मुंबईकरांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्या; भाजप नेत्यांची सरकारकडे मागणी

कोरोनाच्या संपूर्ण कालखंडामध्ये उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक झालेली नाही. या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती नंतर तरी उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपनगरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश द्यावेत, अशीमागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कृष्ण जोशी

मुंबई : परवाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गरीब मुंबईकरांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. कांदीवलीचे आमदार अतुल भातखळकर, घाटकोपरचे आमदार पराग शहा, नगरसेविका शीतल गंभीर देसाई व राजेश्री शिरवडकर आदींनी ही मागणी केली आहे. नुकसान झालेल्यांना तातडीने घरटी दहा हजार रुपये मदत द्यावी, असे भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

 'मंगळवारी व बुधवारी मुंबई पडलेल्या पावसामुळे झोपडपट्टी तसेच चाळीत राहणाऱ्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी आल्याने त्यांचे सर्व साहित्य वाया गेले. लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक विवंचनेत असताना नैसर्गिक आपत्तीने लोकांचे नुकसान झाल्याने सरकारने त्यांना दिलासा देणे जरुरी आहे. कालच मुंबई महापालिका आयुक्तांनी या पावसासंदर्भात बोलताना हे छोटे वादळ असल्याचे म्हटले आहे. १२ तासात मुंबईमध्ये २९४ मिमी एवढा पाऊस झाला, याचाच अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून सरकारने नजरअंदाज सर्वेक्षण करावे. हे सर्वेक्षण घरटी न करता वस्तीनिहाय करावे,' अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनाच्या संपूर्ण कालखंडामध्ये उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक झालेली नाही. या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती नंतर तरी उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपनगरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

 नुकसानभरपाईची पद्धत ठरवा

अतिवृष्टीमुळे कोणाचे किती नुकसान झाले, त्यांना नुकसानभरपाई कशी देणार हे ठरवायला हवे, पण दुकानदार आणि झोपडीवासीय यांचे नुकसान सरकारने काही अंशी तर भरून दिलेच पाहिजे. शेतकऱ्यांप्रमाणेच शहरातील रहिवाशांनाही निदान एकरकमी नुकसानभरपाई द्यावी, असे घाटकोपरचे आमदार पराग शहा यांनी सांगितले.

दुकानांचेही नुकसान झाले

या अतिवृष्टीत रहिवाशांबरोबरच दुकानांचेही नुकसान झाले असल्याने त्यांनादेखील नुकसानभरपाई द्या, अशी मागणी माहीमच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई आणि प्रभाग क्रमांक १७२ च्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी केली आहे. पाण्यामुळे दुकानदारांचे फर्निचर खराब झालेच पण दुकानातील साहित्य तसेच अन्नधान्य, खाद्यपदार्थ हे देखील नष्ट झाले आहेत. कोरोनाच्या दुष्काळात अतिवृष्टीचा तेरावा महिना आल्यामुळे सरकारने नागरिकांना मदत करावी, असे पत्र श्रीमती शिरवडकर व श्रीमती देसाई यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT