Thane News : ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी तब्बल ३७०० हून अधिक वृक्ष बाधित होणार असताना सोमवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेत वृक्षतोडीच्या मुद्द्यापेक्षा सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. वृक्षतोडीला विरोध करणारे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. मात्र, त्यांच्या भूमिकेला स्वपक्षीयांकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे पाहून अखेर सभात्यागाचा प्रयत्न करणारे पवार एकटेच सभागृहाबाहेर पडले.
ठाणे रिंग मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मेट्रो स्थानके, ट्विन टनेल यांसह विविध विकासकामे तसेच काही खासगी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष बाधित होणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत महासभेत मांडण्यात आला. हजारो झाडांवर परिणाम होणार असल्याने प्रस्तावावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रस्ताव सूचनेसह मंजूर करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून घाई केली जात असल्याचे चित्र सभागृहात दिसून आले.
वृक्षतोडीच्या प्रस्तावाला आक्षेप घेत नारायण पवार यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारले. बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन वृक्ष नेमके कुठे लावण्यात येणार आहेत? त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे का? पुर्नलागवडीचे नियोजन काय आहे? याची माहिती स्पष्टपणे देण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवक अमित सरेय्या यांनीही पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित केला. मात्र, या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याऐवजी प्रस्ताव मंजुरीकडेच अधिक भर दिला जात असल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
वृक्षतोडीच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी होत असतानाच तो सूचनेसह मंजूर करण्याची भूमिका घेतली गेल्याने पवार अधिक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांच्यासह भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही प्रस्तावाला ठोस विरोध न केल्याने पवार यांनी सभागृहातच नाराजी व्यक्त केली. यावेळी पवार यांनी मोकाशी यांना जाब विचारला. त्यातून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद महासभेच्या व्यासपीठावरच उघड झाल्याची चर्चा रंगली.
स्वपक्षीयांकडून साथ मिळत नसल्याने नारायण पवार यांनी इतर नगरसेवकांना सोबत घेऊन सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटनेत्यांकडून नगरसेवकांना सभागृहातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिणामी पवार यांच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वृक्षतोडीच्या प्रस्तावाला विरोध करत पवार यांनी सभात्याग केला; मात्र त्यांच्यासोबत अन्य नगरसेवक सभागृहाबाहेर पडले नाहीत. त्यामुळे पवार यांनाच एकट्याने सभागृह सोडावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नगरसेवकांमध्येही वृक्षतोडीसह मालमत्ता करवाढ आणि अन्य प्रस्तावांवर आक्षेप असल्याचे दिसून आले. मात्र, नेतृत्वाकडून प्रस्तावांना सूचनेसह मंजुरी देण्याची भूमिका घेतल्याने काही नगरसेवकांना आपली आक्रमक भूमिका मवाळ करावी लागल्याचे चित्र होते. त्यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नापेक्षा राजकीय गटबाजी, नेतृत्वाचे निर्देश आणि सत्तेची समीकरणेच महासभेत वरचढ ठरल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.