BJP
BJP sarkarnama
मुंबई

भाजपच्या आता गावोगावी शाखा; राज्यात 10 लाख वॉरिअर

मृणालिनी नानिवडेकर : सरकारनामा ब्यूरो

मुंबई : घर घर मोदी हर हर मोदी, वन बुथ टेन युथ, या गाजलेल्या घोषणांना प्रत्यक्षात उतरवणारा भारतीय जनता पक्ष (BJP) आता महाराष्ट्रातही शाखाबद्ध होणार आहे. शिवसेनेच्या (ShivSena) शाखांनी महाराष्ट्रात एकेकाळी मिळवलेल्या तूफान यशांचा कित्ता गिरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, असे समजते. प्रत्येक गावात किमान दोन शाखा सुरु करण्यात येणार आहेत. युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे या मोहिमेमागचे ध्येय असल्याचे सांगितले जात आहे.

शाखा युवकांना आकर्षित करून त्यांच्या शक्तीचा परिवर्तनासाठी उपयोग करणार आहे. गावातील अन शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरु झालेल्या योजनांचा तपशील पोहोचावा हे या शाखेचे काम असेल. मात्र, राष्ट्रउभारणीशी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख उद्देश असणार आहे. गाव तेथे शाखा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हीट सेनेने साधलेली कामगिरी. शिवसेना भाजप यांच्या भगव्या युतीने महाराष्ट्र जिंकल्यानंतर शाखेचे महत्व राजकीय वर्तुळाच्या लक्षात आले होते. भाजपला गुरुस्थानी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही शाखेला विलक्षण महत्व आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यावर युवकांचा मतदानातला सहभाग कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुण मते भाजपकडे वळावीत यासाठी १८ ते २५ या वयोगटात संपर्क अभियान राबवले जात आहे. आता या वयोगटाला जोडून ठेवण्यासाठी भाजप १० लाख युवकांना संपर्कदूत नेमणार आहे. या युवकांच्या मार्फत गावागावात किमान दोन भाजप शाखा सुरु केल्या जाणार आहे. आपण देशासाठी काय करु शकतो याचा विचार करणे हे नव्याने सुरु होणाऱ्या या शाखेचे वैशिष्टय असेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ६ सप्टेंबर रोजी बारामती येथे भाजपच्या या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. भाजपने तयार केलेल्या रचनेनुसार युवक वर्गाला तुमचे मतदान देशाची दिशा ठरवेल हे तर समजावून सांगितले जाणार आहे. शिवाय युवकांना आवश्यक असलेली जीवनकौशल्येही भाजपतर्फे शिकवली जातील.

आयटीचा वापर, प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज अशा अत्यंत महत्वाच्या गोष्टी युवकांना समजावून सांगितल्या जाणार आहे. व्यक्तीगत उत्कर्षातून भारत देश समृध्द होईल हे या शाखेचे सूत्र असेल. पन्नाप्रमुखासमवेत काम करणाऱ्या या युवकांना वॉरिअर किंवा योध्दे असे संबोधले जाणार आहे. बावनकुळे यांनी प्रदेश भाजपच्या मुख्य चमूत काम करताना युवकांकडे विशेष लक्ष दिले होते, आता ही मोहिम युध्दपातळीवर राबवली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT