Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar  Sarkarnama
मुंबई

हम किसी को छेडेंगे नही, पर किसीने छेडा तो छोडेंगे नही! भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेचा (Shivsena) भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मुंबई भाजपने (BJP) सुरू केलेल्या पोलखोल मोहिमेत कांदिवलीच्या सभेत भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले. पोलखोल यात्रेत शिवसेनेने आदल्या दिवशी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. हम किसी को छेडेंगे नही, पर किसीने छेडा तो छोडेंगे नही, असा इशाराही भातखळकरांनी शिवसेनेला दिला आहे.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही, महापालिकेकडून रहिवाशांना सुविधा मिळत नाहीत, आकुर्ली प्रसूतिगृहाची इमारत पाडून तीन वर्षे होऊनही नवे प्रसूतिगृह बांधायच्या हालचाली नाहीत, असा सत्ताधारी शिवसेनेच्या अपयशाचा पाढा भातखळकरांनी वाचला. ते म्हणाले की, हनुमाननगर, पोयसर येथे नदी रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या शंभर कुटुंबांचे महामार्गाजवळच आपण एसआरएमार्फत पुनर्वसन केले आहे. इतरांनाही याच परिसरात घरे देण्याचा प्रश्न महापालिकेने सोडवायला हवा. रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा होताना दिसत नाही. कांदिवली (पूर्व) मतदारसंघातील लोखंडवाला डीपी रोड पूर्ण झाला असला तरी त्याचे शेजारच्या मतदारसंघातील काम काम अपूर्ण आहे. हा सारा महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुना आहे.

चेंबूर कॅम्प येथील भाजप कार्यालयात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत पोलखोल अभियानाच्या रथ यात्रेची सुरुवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आदल्या रात्रीच अज्ञातांकडून रथाचे नुकसान करण्यात आले . या गाडीचे नुकसान हे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

गाडीची फोडतोड करणाऱ्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजप चे सगळे नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला समोर जावं लागेल, असा इशाराही लाड यांनी दिला. ते म्हणाले की, भाजपकडून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यात येत आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रात्रीच्या अंधारात हा पाठीमागून हल्ला करण्यात आला आहे. ज्याप्रकारे 2019 ला पाठीत खंजीर खुपसण्याच काम त्यांनी केलं, तशाच प्रकारचा हा हल्ला त्यांच्याकडून करण्यात आला आहे. माझे त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर समोर येऊन दगड मारून दाखवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT