chandrakant patil Latest Marathi News
chandrakant patil Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

भाजपचा पाचवा उमेदवार आणि सदाभाऊ खोत कसे जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर गुरूवारी विधान परिषदेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्यांची वाट बिकट आहे. पाचव्या उमेदवारासाठी भाजपलाच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मग खोत यांना कसं निवडून आणणार, हा प्रश्नच आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे कोडं सोडवलं आहे. (Chandrakant Patil Latest Marathi News)

भाजपचे पाचही उमेदवार आणि सदाभाऊ खोतही विजयी होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. विजयाची खात्री देताना पाटील म्हणाले, सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधील प्रचंड लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी आझाद मैदानात उपोषणात पंधरा दिवस सहभाग घेतला होता. त्यामुळे शेतकरी असो किंवा या राज्यात अन्याय होणाऱ्या नागरिकांसाठी सदसद्विवेकबुध्लीला स्मरून आमदार मतदान करतील.

पाचव्या उमेदवारासाठीही आवश्यक मत सदसद्विवेकबुध्दीला स्मरून आमदार मतं देतील. त्यामुळे भाजपचे पाच अधिकृत आणि एक अपक्ष उमेदवार निवडून येतील, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीची मतंही भाजपला मिळतील, असे संकेतही पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खोत यांनीही आज अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. खोत यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू होती. पण पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना पाटील यांनी खोत हे अपक्ष उमेदवार असतील असं सांगितलं.

भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर पाचव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यातच सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देत भाजपने डाव टाकला आहे. पण मतांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT