Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

राष्ट्रपती राजवटीची चर्चा अन् फडणवीसांचे थेट केंद्रीय गृह सचिवांना पत्र

: हनुमान चालीसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. एकीकडे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणावरून राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. एकीकडे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खास पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपनं (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काही नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य केलं आहे. पण फडणवीस यांनी भाजपनं अशी कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही आणि करणारही नाही, असं स्पष्ट केलं आहे. पण सोमय्या यांच्या हल्ल्याच्या विरोधात फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहून कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्यमंडळानेही भल्ला यांची आज भेट घेतली आहे.

फडणवीसांनी काय म्हटलंय पत्रात?

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पतीन रवी राणा यांना हनुमान चालीसा पठणाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी 23 एप्रलि रोजी अटक केली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तिथे गेले होते. आपल्यावर हल्ला होऊ शकतो, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. पण त्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या. दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फूटल्या असून तेही जखमी झाले. पोलिसांना सांगूनही त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी हटवली नाही. पोलिसांच्या उपस्थितीत सोमय्यांवर हल्ला झाला. हे खूपच आपत्तीजनक आणि गंभीर आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या आडून ही गुंड़गिरी केली जात आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारची झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांच्या सुरक्षेविषयी महाराष्ट्र मुंबई पोलीस गंभीर नाही.

सोमय्या यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. मुंबई पोलीस देशातील सर्वात चांगलं पोलीस दल असलं तरी महाविकास आघाडी सरकारसाठी नोकराप्रमाणे काम करत आहे. मुंबई पोलिसांनी अजूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. असं करून मुंबई पोलीस अप्रत्यक्षपणे सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. राजकीय दबावामुळे हल्लेखोरांवर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विरोधी पक्षांच्या मुलभूत अधिकारांचे हनन सुरू असून अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत तातडीने कठोर कारवाई करावी, अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT