Ajit Pawar, kirit Somaiya
Ajit Pawar, kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

सोमय्या मुलाविषयी बोलताच अजित पवार म्हणाले, त्यांनी त्यांच्या पध्दतीने काम करावं!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांनी अनेक नेत्यांच्या प्राप्तीकर विभाग, ईडीसह इतर तपास यंत्रणांकडे केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले आहेत. आता सोमय्या यांनी अजित पवारांच्या मुलाचे कारनामे उघड करण्याचा इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना गुरूवारी अजित पवारांचा मुलगा जय पवारने (Jay Pawar) काय कारनामे केलेत ते उघड करणार असल्याचे सांगितले आहे. अजित पवारांची 1 हजार 55 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती घोषित झाली आहे. आता पुढे बघा काय होतं. अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचेही कारनामे समोर आणणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले आहे. सोमय्या यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

सोमय्या यांच्या या विधानाबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना पवार म्हणाले, कुणी काय वक्तव्य केलं त्यासंदर्भात आमच्यासारख्याने जास्त बोलून त्यांना महत्व देण्याचे काही कारण नाही. त्यांनी त्यांच्या पध्दतीने काम करावे. देशात नियमांचे उल्लंघन कोणी करत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी कायदे आहेत. ते कुणाचंही नाव घेतील आणि तुम्ही प्रश्न विचाराल तर हे योग्य नाही. आम्हाला कुणाच्याही कुटुंबीयांवर बोलायचं नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

सोमय्या हे मनोरंजन करणारं पात्र

मंत्रालयात येऊन फाईल चेक केल्याचा मुद्दा माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मलिक म्हणाले, सोमय्या हे मनोरंजन करणारे पात्र असून त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन होत आहे. त्यांनी आणखी मनोरंजन करत रहावे. त्यांना अगोदर पक्ष गंभीरतेने घेत नव्हता आणि आम्हीही गंभीरतेने आम्ही घेत नाही, अशा शब्दात मलिकांनी सोमय्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांना राज्यसरकारकडून नोटीस बजावल्यावरुन सोमय्या कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर, भाजप नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. नोटीस मिळाल्यानंतर सोमय्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मी प्रताप सरनाईकांची फाईल बघायला मंत्रालयात गेलो होतो. त्यांनी चोरी, लबाडीने बांधकाम केले, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो, असे सोमय्यांनी सांगितले. तसेच, त्यावेळी सरनाईकांना आत येण्यासाठी मुभा कशी दिली गेली? असा उलट सवालही सोमय्यांनी विचारला.याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे खुले आव्हानही त्यांनी केले. तर, याप्ररणावरुन फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT