Nilesh Rane, Nitesh Rane
Nilesh Rane, Nitesh Rane Sarkarnama
मुंबई

इतना सन्नाटा क्यों है भाई? विरोधकांवर जहरी टीका करणाऱ्या राणे बंधूंना झालंय काय?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेसह (Shiv Sena) इतर विरोधकांवर जहरी टीकेचे बाण सोडत घायाळ करणारे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सध्या तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. दररोज ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांवर आपल्या शैलीत टीकास्त्र सोडणाऱ्या राणे बंधूंनी नव्या वर्षात जणू मौन पाळलं आहे. विरोधकांवर टीका करणे तर सोडाच पण त्यांचा साधा उल्लेख असलेलं एकही ट्विटही दोघांनी केलेलं नाही.

नितेश व निलेश राणेंकडून सतत शिवसेनेतील नेत्यांसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली जाते. अनेकदा एकेरी भाषेत उल्लेख करून ट्विटरवर वाद निर्माण करणारे फोटो टाकून डिवचत असतात. नितेश यांनी विधान भवनाच्या आवारातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना उद्देशून म्याव...म्याव...म्हटल्याचा मुद्दा अधिवेशनातही गाजला. पण नवीन वर्षात दोघा बंधूंचा हा टिवटिवाट बंद झाला आहे. दोघांचेही ट्विटर हँडल पाहिल्यास हे 'तेच' राणे आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे ते सध्या अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे. जामीनावर सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक न करण्याची हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. पण त्यानंतर नितेश राणे प्रकटलेले नाहीत.

नितेश राणे यांचे शेवटचे ट्विट 26 डिसेंबरचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी या ट्विटमध्ये व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडीवर (MahaVikas Aghadi) टीका केली होती. पण त्यानंतर निवडणुकीचा निकाल त्यांच्याबाजूने लागला, नवीन वर्ष सुरू होऊन बारा दिवस झाले तरी त्यांनी एकही ट्विट टाकलेले नाही. त्यांचे बंधू निलेश राणे यांनीही तलवार म्यान केली आहे.

निलेश राणे यांनी 31 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीका करणारे ट्विट केले होते. त्यानंतर नव्या वर्षातील पहिल्या दिवशी त्यांनी शुभेच्छा दिल्याचे दिसते. या वर्षातले बारा दिवस अभिवादन, शुभेच्छा आणि श्रध्दांजली अशीच ट्विट त्यांनी केली आहेत. नेत्यांवर टीका, इशारा, आव्हान असं काहीच त्यांच्या ट्विटमध्ये दिसत नाही.

नितेश राणेंचं ट्विट न करण्याचं कारण नेटकरी समजू शकतात. पण निलेश राणे का गप्प आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत ट्विटरवर हा 'सन्नाटा' असाच राहील, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता आज न्यायालयात नितेश यांना दिलासा मिळतो की अटकेची टांगती तलवार कायम राहणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT