Pankaja Munde, Dhananjay Munde
Pankaja Munde, Dhananjay Munde sarkarnama
मुंबई

धनंजय मुंडेंची, पंकजांच्या डोक्यावर मायेची टपली; बंधु-भगिनीचा मिष्किल अंदाज!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या दोघा भावा-बहिणीमध्ये राजकीय आरोप-प्रत्योप सगळ्यांना माहिती झाले आहेत. मात्र, राजकारणाचा विषय सोडला तर इतर बाबतीत या दोन्ही भावा-बहिणीने सलोख्याचेच नाते जपले आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात आज मुंडे बंधू-भगिनींचे एक अनोखे रुप राज्याला पहायला मिळाले.

नेत्र चिकीत्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते व राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पर्यचन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), क्रिडा मंत्री सुनील केदार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा उल्लेख 'लेन्स' असा करत आभार मानले. मात्र, आपले भाऊ धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना पंकजा यांनी मुंडेंच्या लेन्समधून बघत असताना पवारांच्या लेन्स घालून फोकस करण्याचे भाग्य ज्यांना लाभले असे आमचे बंधू", असा उल्लेख केला. त्यावर सभागृहात एकच हाशा पिकला.

यानंतर भाषणासाठी उठलेल्या धनंजय मुंडे यांनी डायसकडे जात असतांना पंकजा मुंडे यांच्या डोक्यावर टपली मारली याला पंकजा यांनीही हसत दाद दिली. त्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांनी मुंडे बंधु-भगिनींचा मिष्किल अंदाज अनुभवला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना उत्तर देताना म्हटले, कधी तरी ताई अशा लेन्ससच्या फोकसमध्ये आपल्याला यावे लागते. आम्ही आणि आदित्य ठाकरे बोलत बसलो होते. ते म्हणाले कदाचीत ताईंनी लेन्स बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बर होईल. असे ते म्हणत होते, मी नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीची ऑफर दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT