Vishawas Nangare Patil and Pravin Darekar
Vishawas Nangare Patil and Pravin Darekar  Sarkarnama
मुंबई

पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी भाजपचे दरेकर आग्रही

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एस.टी. (ST) कामगारांनी विलीनीकरणाची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता. यावरून राज्यभरात गदारोळ उडाला आहे. आता या प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी थेट मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil) यांना ओढले आहे. नांगरे-पाटील यांच्यावर कारवाईची मागणी दरेकरांनी केल्याने खळबळ उडाली आहे. (Silver Oak attack case news updates)

शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी सर्वांत आधी पोचणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नांगरे-पाटलांचा समावेश होता. या हल्ल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी थेट मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे. याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, पवारांच्या घरावर हल्ला झाला त्यादिवशी विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये होते. ते काल गृहमंत्री दिलीप वळसे- पाटलांनाही भेटायला गेले होते.

पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पवारांच्या घरावर हल्ला करणारे 110 एसटी कामगार न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या प्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात दोन ते तीन एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. त्यांना आज गिरगाव येथील न्यायालयात पोलीस हजर करणार आहेत. दरम्यान, सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

याचबरोबर काही पत्रकारही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कारण हल्ला घडला त्यावेळी पत्रकारही हजर होते. त्यामुळे त्यांना आधीच हल्ल्याची पूर्वकल्पना होती, असा दावा केला जात आहे. त्यांना हल्ल्याची माहिती आधीच कोठून मिळाली, याची चौकशी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. पवार यांच्या घरावर हल्ल्याची माहिती आधीपासून कोणत्या पत्रकारांना होती, याचा तपास सुरु आहे. या पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. पोलिसांकडून यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. त्यामुळे या पत्रकारांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT