Pravin Darekar

 
मुंबई

मुख्यमंत्री ठाकरेंसह अजितदादांनी दरेकरांचा विजय केला सोपा!

मुंबई बँकेवर पुन्हा एका प्रवीण दरेकर यांनी वर्चस्व मिळवलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच मुंबै बँकेवर (Mumbai District Bank) विद्यमान अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचेच वर्चस्व आहे. पुन्हा एकदा त्यांनी या बँकेवर सत्ता मिळवली. पण यावेळी त्यांनी शिवसेना (Shiv Sena), व राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोबत घेत हा विजय मिळवला आहे.

निवडणूक (Election) बिनविरोध करण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येत अनोखी युती तयार केली होती. राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. आता अशीच युती मुंबई बँकेतही पाहायला मिळवली. निवडणूक टाळण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे दरेकर यांचा विजय सोपा झाल्याचे मानलेे जाते.

दरेकर यांच्या नेतृत्वाखाली या तीनही पक्षांचे सहकार पॅनेल उभे करण्यात आले होते. त्यामुळेच एकूण 21 जागांपैकी 17 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. दरेकर हेही दोन मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. त्यापैकी एका जागेवर शिवसेनेेचे अभिजित अडसूळ यांनी माघार घेतली. इतर जागांसाठीही शिवसेनेच्या तिघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, दोघांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवल्याने चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर व शिल्पा सरपोतदार हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत शिवसेना व राष्ट्रवादीने निवडणुकीआधी दिले होते.

दरम्यान, बँकेच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ता. 2 जानेवारी रोजी चार जागांसाठी निवडणूक झाली होती. जागाही दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने जिंकल्या आहेत. सहकार पॅनेलच्या पुरुषोत्तम दळवी (मध्यवर्ती ग्राहक), विठ्ठल भोसले (प्राथमिक ग्राहक), जयश्री पांचाळ (महिला सहकारी संस्था) आणि अनिल गजरे (भटक्या विमुक्त जातीजमाती) हे विजयी झाले आहेत. त्यांना अनुक्रमे कमलाकर नाईक, सुखदेव चौगुले, शालिनी गायकवाड आणि यलप्पा कुशाळकर यांनी आव्हान दिले होते. शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक झाली.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार -

अर्बन बँक गटातून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संदीप घनदाट, गृहनिर्माण सहकारी संस्था गटातून आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, पगारदार पतसंस्था गटातून आमदार प्रसाद लाट, नागरी पतसंस्था गटातून शिवाजीराव नलावडे, महिला गटातून शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, इतर मागासवर्ग गटातून नितीन बनकर, एससी-एसटी गटातून विनोद बोरसे, औद्योगिक गटातून विष्णू घुमरे, सिध्दार्थ कांबळे, इतर सहकारी संस्था गटातून नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, वैयक्तिक गटातून सेनदेव पाटील आणि मजूर संस्था गटातून आनंदराव गोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT