Ritu Tawde and Kishori Pednekar clash Sarkarnama
मुंबई

BMC News : ‘खिचडीखाऊ ताई’वरून पेटलं राजकीय रण; ‘जिम, जर्मनी ते परभणी’ म्हणत पेडणेकरांचा पलटवार, तावडेंचा खुलासा

Ritu Tawde VS Kishori Pednekar : महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली; ‘मी जर्मनी किंवा परभणीला गेलेली नाही’ म्हणत तावडेंनी आरोप फेटाळले.

Pradeep Pendhare

Mumbai BMC political controversy : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना आता वैयक्तिक टीकेची धार आली आहे.

तावडेंनी पेडणेकर यांचा ‘खिचडीखाऊ ताई’ असा उल्लेख केल्यानंतर पेडणेकर यांनी ‘जिम, जर्मनी ते परभणी’ असा पलटवार करत गंभीर आरोप केले. मात्र, तावडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, ‘मी आयुष्यात कधीही जर्मनी किंवा परभणीला गेलेली नाही,’ असा खुलासा केला.

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत भाजपच्या (BJP) महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. ‘खिचडीखाऊ ताई’ असा उल्लेख करत त्यांनी आपल्याला अडचणीत आणणारी प्रकरणे बाहेर काढण्यामागे पेडणेकर यांचाच हात असल्याचा आरोप केला होता. ‘झारीतील शुक्राचार्य’ असा सूचक उल्लेखही तावडेंनी केला होता.

या आरोपांना उत्तर देताना शिवसेना ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत तावडेंवर पलटवार केला. ‘महापौरांना जिम, जर्मनी ते परभणीचा अर्थ काय, हे विचारले पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याचे धागेदोरे थेट वाशीपर्यंत पोहोचतात. मी हे प्रकरण उघडकीस आणले तर सर्व काही बाहेर पडेल,’ असा दावा पेडणेकर यांनी केला.

उधळपट्टीवरून पेडणेकरांचा तावडेंवर वार

महापौरांच्या बंगल्याच्या दुरुस्तीच्या प्रस्तावावरूनही पेडणेकर यांनी तावडेंना लक्ष्य केले. ‘महात्मा गांधी यांच्या तत्त्वांचा दाखला देत खुर्चीवर आलेल्या महापौरांनी सुरुवातीला बंगल्याचा ताबा घेतला नाही. मात्र, त्याच काळात बंगल्याच्या डागडुजीसाठी तीन ते चार कोटी रुपये आणि फेन्सिंगसाठी दोन ते अडीच कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव आणण्यात आला. ही उधळपट्टी आहे,’ असा आरोप त्यांनी केला.

रितू तावडेंचा पलटवार

किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना रितू तावडे यांनीही तातडीने प्रत्युत्तर दिले. ‘मातोश्रीच्या दबावामुळे पेडणेकर अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांना स्वप्नातही मीच दिसते. त्यामुळे त्या माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत,’ अशी टीका तावडेंनी केली. ‘मी आयुष्यात कधीही जर्मनी किंवा परभणीला गेलेली नाही. गेल्या दहा वर्षांत माझा पासपोर्टही बनलेला नाही. पासपोर्ट नूतनीकरणासाठी मी 15 दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन अद्याप बाकी आहे,’ असा खुलासा तावडेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT