Varun Sardesai Latest News, Nitesh Rane News
Varun Sardesai Latest News, Nitesh Rane News Sarkarnama
मुंबई

तो 'माजी' सरकारी भाचा, 'Mr. India' झाला आहे का? नितेश राणेही सरदेसाईंच्या शोधात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्ष कठीण काळातून जात असताना ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वरुण सरदेसाई मात्र मुंबईत दिसले नाहीत. सोशल मीडियातही सक्रीय नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले असून आता ठाकरेंच्या विरोधकांनीही त्यावर बोट ठेवलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी बंडखोरांविरोधात आंदोलन झाले. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर असलेले सरदेसाई मात्र कुठेच दिसले नाहीत. (Varun Sardesai Latest Marathi News)

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी याबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. 'तो 'माजी' सरकारी भाचा, 'Mr. India' झाला आहे का?,' असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. भाच्यानेच उद्धव ठाकरे यांना दगा दिल्याचे राणे यांनी म्हटलं आहे

'उद्धव ठाकरे म्हणतात की, मला शिंदेसाहेबांबरोबर गेलेल्या आमदारांनी दगा दिला. मी उद्धवजींना सांगेन की, दगा नेमका कुणी दिला हे खऱ्याअर्थानं पाहायचं असेल, तर आपण आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे. आपल्या अवतीभवती असलेले, कधीही निवडून न येणारे जे लोकं आहेत, त्यांनीच खऱ्याअर्थाने दगा दिला हे उद्धवजींनाच कळालेच नाही. सुरूवात करायची असेल तर आपल्या भाच्यापासून सुरू करा,' असं राणेंनी म्हटलं आहे.

ज्यांनी अडीच वर्षाच्या तुमच्या कारकीर्दीत तुमची बदनामी केली. सत्तेचा गैरवापर केला. लोकांच्या घरासमोर जाणं, लोकांच्या घरासमोर धिंगाणा घालणं आणि भ्रष्टाचार करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या भाच्यानं केल्या आहेत. हे सगळं तुम्हाला कळालं नसल्याने आजची परिस्थिती तुमच्यावर आली आहे, अशी टीकाही राणेंनी केली.

पक्षातील बंडानंतर शिवसेना हादरून गेली आहे. बंडखोर आमदारांवर अनेक नेते तुटून पडत आहेत. माध्यमांशी संवाद, व्हिडीओ, ट्विटर, फेसबुकसह विविध माध्यमांतून पक्षाचे नेते, पदाधिकारी बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. पण युवा सेनेचा आक्रमक चेहरा असलेले वरुण सरदेसाई मागील वीस दिवसांत ना रस्त्यावर दिसले, ना आदित्य ठाकरेंसोबत. वरुण हे युवा सेनेचे सचिव आहेत.

वरुण हे सोशल मीडियात सतत अॅक्टिव्ह असतात. पण 15 जूननंतर ट्विटर व फेसबुकवर त्यांची एकही पोस्ट नाही. आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची शेवटची पोस्ट आहे. त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या दोन आमदारांच्या विजयानंतर साधं अभिनंदनाचं ट्विटही केलेलं नाही. ते मागील काही दिवसांतील राजकीय घडामोडींदरम्यान एकदाही माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तेही नाराज आहेत की अन्य काही कारणे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT