Pragya Singh Thakur
Pragya Singh Thakur Sarkarnama
मुंबई

बोलावू तेव्हा हजर व्हा! 'एनआयए' न्यायालयाची भाजप खासदाराला तंबी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपच्या (BJP) खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Thakur) या मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blasts) खटल्याच्या सुनावणीस अनेकदा अनुपस्थित राहिल्या आहेत. पण प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित न राहणाऱ्या प्रज्ञा ठाकूर या कबड्डी खेळतानाचे, नृत्य करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर अखेर बुधवारी त्यांनी मुंबईतील विशेष NIA न्यायालयात हजर झाल्या.

प्रज्ञा ठाकूर न्यायालयात आल्यानंतर त्या जाण्याच्या घाईत असल्याचे दिसून आले. आपल्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल व्हायचं असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यांच्या वकिलांनीही त्या विमानतळावरून आल्या असून आता थेट रुग्णालयात जायचे असल्याचे नमूद केलं. त्यावर न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. 'तुम्ही ठीक आहात का? मागील वेळी तुम्ही प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते, अशी विचारणा न्यायालयानं केली.

न्यायालयाच्या विचारणेनंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आता किती दिवस रुग्णालयात थांबावे लागेल, हे डॉक्टर सांगतील, असं उत्तर दिलं. त्यानंतर न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना आम्ही बोलावू तेव्हा न्यायालयात हजर रहा. तुमच्या वकिलांकडून केसची माहिती घ्या, असं बजावलं. त्यानंतर प्रज्ञा या न्यायालयातून गेल्या.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळालेल्या प्रज्ञा ठाकूर वादात अडकल्या होत्या. भोपाळमधील काली मंदिरात प्रज्ञा या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलींसोबत कबड्डी खेळली होती. कबड्डी खेळण्याची विनंती त्यांनी खेळाडूंनी केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेसने यावरून प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधला होता. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनी यावरून प्रश्न उपस्थित केला होता. मालेगाव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात पुढील सुनावणी कधी आहे, असे त्यांनी म्हटले होते.

खासदार ठाकूर यांनी 14 जुलैला घरीच कोरोना लस घेतली होती. यावरुन प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना घरी जाऊन लस देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी एका विवाह समारंभात नाचताना दिसल्या होत्या. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. लग्नात नाचण्यासाठी तंदुरुस्त असलेल्या खासदार आता लस घेण्यासाठी आजारी कशा पडल्या, असा सवाल विरोधकांनी केला होता.

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती. नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2017 जामीन मंजूर झाला होता. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी अनेक वेळा ठाकूर यांनी केली आहे. असे असताना आता त्या लग्नात नाचत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा विवाह समारंभ त्यांच्याच निवासस्थानी झाला होता. त्या वेळी 51 वर्षांच्या ठाकूर या नाचताना दिसल्या होत्या. त्याआधी प्रज्ञा ठाकूर या बास्केटबॉल खेळताना दिसल्या होत्या. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT