Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan Rane sarkarnama
मुंबई

शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंनी बोध घ्यावा ; राणेंचा खोचक सल्ला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकालानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी काल कौतुक केलं. "निवडणुकीत जो चमत्कार झाला तो मान्य करावा लागेल. फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली. अपक्षांना वळविण्यात त्यांना यश आले," असं पवार काल म्हणाले होते.

शरद पवारांच्या या विधानाचा आधार घेत भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. राणे आज माध्यमांशी बोलत होते. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन उद्धव ठाकरे यांनी शिकावे, असा खोचक सल्ला राणेंनी दिला आहे.

नारायण राणे म्हणाले, "राज्यसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीसांनी माणसे जपली, आमदारांचा विश्वास संपादन केला, असे पवार म्हणाले. खऱ्याला खरे म्हणणाऱ्या शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांनी शिकावे, पवारांकडून ठाकरेंनी बोध घ्यावा. मात्र, ठाकरेंचा स्वभाव माहित असल्यामुळे ते सत्य स्वीकारतील, असं वाटत नाही,"

"निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे," असे राणे म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्या पाहिजे, आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपने जिंकली," असे राणेंनी नमूद केले.

राणे म्हणाले, "निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT