BJP News Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने टाकला 'टॉप गिअर'; पक्ष विस्तारकांचा प्रशिक्षण वर्ग सुरू

Ganesh Thombare

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या देत बैठकांचा सध्या धडाका सुरू आहे. यातच आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने 'टॉप गिअर' टाकला आहे.

महाराष्ट्रात लोकसभेसाठी भाजपने 'मिशन 45'ची घोषणा केलेली आहे. या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' यशस्वी करण्यासाठी भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांचा प्रशिक्षण वर्ग दादरच्या वसंतस्मृती सभागृहात सुरू करण्यात आला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच्या प्रशिक्षण वर्गात विस्तारकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप रणनीती आखत असून, 'मिशन 45' पूर्ण यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काही कानमंत्र देणार आहेत.

या वेळी राज्यातील सर्वच मतदारसंघांतील पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्या मतदारसंघांत पक्षाची ताकद कमी आहे, त्या मतदारसंघांत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत लालबाग राजाच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी अमित शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सागर बंगल्यावर तब्बल ४५ मिनिटांपेक्षा जास्त चर्चा केली होती.

या चर्चेत प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने खलबतं झाली होती. यानंतर आता भाजपने 'टॉप गिअर' टाकला असून, लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विस्तारकांना पक्षातील वरिष्ठ काय मार्गदर्शन करतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे असणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT