Gopichand Padalkar, Chandrakant Patil
Gopichand Padalkar, Chandrakant Patil Sarkarnama
मुंबई

पडळकरांच्या खानापूरातील पराभवावर चंद्रकांतदादा म्हणाले, आता आटपाडीत बघू!

सरकारनामा ब्युरो

पुणे : खानापूर नगरपंचायतीची निवडणूक (Nagar panchayat Election) भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिष्ठेची केली होती. पण भाजपला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. एवढेच नव्हे तर भाजपच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आटपाडी हा पडळकरांचा खरा बालेकिल्ला असल्याची सारवासारव केली. (Gopichand Padalkar News Updates)

खानापूर (Khanapur) नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना महाआघाडी, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांची जनता आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलने 17 पैकी 9 जागा जिंकून काठावरील बहुमत मिळवले आहे. गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी या निवडणुकीसाठी जोर लावला होता. त्यांनी नगरपंचायतीसाठी पॅनेल उभे करून 17 पैकी 16 जागांवर उमेदवार दिले होते. प्रत्यक्षात भाजपच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. राज्याच्या राजकारणात पडळकरांच्या या पॅनेलच्या पराभवाची जोरदार चर्चा झाली.

याविषयी सोमवारी पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाहीत. संपूर्ण राज्यात त्यांचा प्रभाव आहे. पंढरपूरच्या निवडणुकीच्या विजयात दहा कारणांपैकी पडळकर आणि सदाभाऊ खोत हेही एक आहेत. खानापूर-आटपाडी असा मिळून एक मतदारसंघ होतो. त्यामुळे आटपाडीची निवडणूक लागू दे, मग बघु. तो त्यांचा खरा बालेकिल्ला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

अरे बाबा, तुझे बाबा म्हणते मुख्यमंत्री जर...

प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणांबाबत आम्ही राज्यपालांना निवेदन दिले आहे. त्यावर आदित्य ठाकरे असे म्हणाले की, राजभवन हा भाजपचा अड्डा झाला आहे. अरे बाबा, तुझे बाबा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर एका राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनाही भेटायला उपलब्ध नाहीत. तर मग महाराष्ट्राचे घटनात्मक सर्वोच्च स्थान राज्यपाल आहे. म्हणून आम्ही तिकडे गेलो. तुम्ही उपलब्ध नाहीत, तुमच्याबद्दल कुठलीही खात्री उरलेली नाही. ऐकणार आहात तर मग सरनाईकांबाबत काहीतरी करा, असेही पाटील म्हणाले.

अजित पवार हे इच्छा व्यक्त केली की भेटतात

मला मुख्यमंत्र्यांच्या दोन वर्ष तीन महिन्याच्या कालावधीत एकदा फोन आला होता. त्यानंतर कधीच फोन आला नाही. आम्ही अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला. पण कधी भेटले नाही. मी आणि सुधीरभाऊ मेल करतो. पण त्याचंही उत्तर येत नाही. आजारपणावेळीही चौकशीसाठी प्रयत्न केला. त्यावेळीही भेटले नाहीत. एकदाही भेट नाही, पत्राला उत्तर नाही. अजित पवार हे इच्छा व्यक्त केली की भेटतात, असा टोला पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांचा थयथयाट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणावरही पाटील यांनी निशाणा साधला. शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धवजींनी जे भाषण केले ते दसऱ्यालाही तेच होते. हा केवळ थयथयाट होता. राज्याचे मुख्यमंत्री पक्ष विसरून सर्वांना समान न्याय द्यायला हवा. पण ह्यांची भाषा ठोकेन, तोडेन अशी सुरू आहे. याचाही सर्वसामान्यांनी विचार करण्याची गरज आहे. आठच नगरपंचायतीमध्ये शिवसेनाला सर्वाधिक नऊ जागा मिळाल्या आहेत. 43 नगरपालिकांमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. अशाप्रकारे आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालल्याचे दिसत असल्याने मुख्यमंत्री थयथयाट करत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT