Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
मुंबई

Shivsena Vs BJP : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचे डावपेच; हजार ‘सुपर वॉरियर्सं'ना बावनकुळे देणार कानमंत्र

Vijaykumar Dudhale

राहुल क्षीरसागर

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही दावा करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाणे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत येत्या मंगळवारी (ता. १७ ऑक्टोबर) ठाणे शहराचा झंझावाती दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते भाजपच्या एक हजार `सुपर वॉरियर्स'बरोबर संवाद साधणार असून, `घर चलो अभियानां'तर्गत थेट नागरिकांबरोबर चर्चा करतील. मासुंदा तलावालगत जांभळी नाका येथे त्यांची जाहीर चौक सभा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बावनकुळे काय बोलणार, याची उत्सुकता आहे. (BJP state president Chandrashaekhar Bawankule's visit to Thane)

ठाण्यासह कल्याण लोकसभा काबीज करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. ठाण्यात तर अनेक नावे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली आहेत. कल्याणमध्येही केंद्रीय मंत्र्यांसह इतर नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भाजप या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार ठिणगी पडल्याचेही दिसून आले.

भाजपकडून दावा करण्यात येत असला तरी शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिकडे कल्याणध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मीच लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपच्या महाविजय-२०२४ अभियानांतर्गत लोकसभा प्रवास योजनेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे केले जात आहेत. आतापर्यंत १८ लोकसभा मतदारसंघात त्यांनी संवाद साधला असून, येत्या १७ ऑक्टोबर रोजी ते ठाणे लोकसभा मतदारसंघात येत आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ते ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपने नियुक्त केलेल्या एक हजार सुपर वॉरियर्सबरोबर संवाद साधतील.

या कार्यक्रमानंतर  ‘घर चलो अभियानां’तर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. या अभियानानंतर ते मासुंदा तलावालगत जांभळी नाका येथे जाहीर सभा घेणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्यात बावनकुळे हे प्रभावी व्यक्तिमत्त्व, विविध समाजातील मान्यवर आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते ठाणे लोकसभा मतदारसंघातील एरोली व बेलापूर मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीबाबतच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती सरचिटणीस माधवी नाईक व जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT