मुंबई : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना नोटाबंदीनंतर जवळपास वर्षभर महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नव्हते. बनावट नोटांशी संबंधित प्रकरणे फडणवीसांनी समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) मदतीने दाबली, असे गंभीर आरोप करत अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज हायड्रोजन बाँम्ब फोडला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटने खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी केली असून त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर मलिकांनी हे आरोप फेटाळत हा बाँम्ब फुसका असल्याचे सांगत हायड्रोजन बाँम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज हायड्रोजन बाँम्ब फोडत फडणवीसांवर गंभीर आरोप केले.
यानंतर फडणवीसांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. त्याला त्यांनी आजचा सुविचार म्हटले आहे. त्यांनी जॉर्ज बर्नाड शॉ यांचे वचन उद्धृत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी खूप आधीच शिकलो आहे की डुकरांशी कुस्ती कधीही खेळू नये. त्यात तुमच्या अंगाला घाण लागते. पण यात डुकराला तेच आवडत असते.
नवाब मलिक म्हणाले आहेत की, देवेंद्र फडणवीस जो मूळ मुद्दा आहे तो भरकटवण्याचा आणि समीर वानखेडे यांना वाचवण्याचे काम करत आहेत. एखादा माणूस २००८ मध्ये नोकरीत येतो आणि १४ वर्षापासून मुंबई शहर सोडत नाही, त्याचे कारण फडणवीस आणि वानखेडेंचे जुने संबंध आहेत. फडणवीस इतरांवर आरोप करतात की तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे, पण फडणवीसांना विचारु इच्छितो की गुन्हेगार लोक आहेत त्यांना सरकारी महामंडळांचे अध्यक्ष का बनवले?
नवाब मलिक यांनी फडणवीसांवर नागपूरचा गुंड मुन्ना यादव याच्याशी संबंध असल्याचे आरोप करत त्याला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष का बनवले, असा सवाल केला आहे. हैदर आजम याला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष का बनवले, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, गुन्हेगारांना राजकारणात आणून त्यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हैदर आजम हा बांगलादेशातील लोकांना मुंबईत आणून स्थायिक करण्याचे काम करत नाही का? आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. तिची मालाड पोलिसांनी चौकशी सुरु केली. बंगाल पोलिसांनी तिची कागदपत्र बनावट असल्याचे सांगितल्यानंतर मालाड पोलिसांनी खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप मलिक यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.