BMC News
BMC News Sarkarnama
मुंबई

BMC MNS News: मुंबई महापालिकेचं 'गुजराती'वर प्रेम, मराठीला ठेंगा ; मनसेच्या दणक्यानंतर प्रशासन वठणीवर...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीनं भाजप, शिवसेनेसह महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी उत्तर भारतीय, गुजराती यांसह परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. तर शिवसेना, मनसेनं कायमच मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

महापालिकेच्या मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे जलतरण तलावातील उन्हाळी प्रशिक्षण सत्रांची माहिती देण्यासाठी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारांवर गुजराती भाषेत फलक झळकले आहेत . महापालिकेच्या प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या फलकांवरून मंगळवारी नवा राजकीय वाद पेटला आहे. महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढतानाच मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई(Mumbai)त विविध खासगी संस्थांद्वारे १५ दिवसांच्या जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा मुंबई महापालिकेने जलतरण तलावातील उन्हाळी प्रशिक्षण सत्रांची माहिती देण्यासाठी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर गुजराती भाषेत फलक झळकावले. ही बाब निदर्शनास येताच मनसेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. यानंतर व्यवस्थापनाकडून तात्काळ गुजराती भाषेतील फलक हटवला.

मनसे(MNS)चे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी गुजरातीत झळकलेले फलक प्रकरण समोर आणले होते. यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलावाच्या प्रशिक्षण सत्राची सर्व माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. मात्र, हे फलक गुजराती भाषेत झळकले. मनसेकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आल्यानंतर महापालिकेच्या व्यवस्थापनानं तो फलक तातडीने हटवला.

यावर सत्यवान दळवी म्हणाले, मुंबई पालिके(BMC)च्या संबंधित विभागाकडूनच गुजराती भाषेत फलक लावण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. ही बाब नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देण्यात आली व फलक काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर महापालिका व्यवस्थापनानं गुजराती भाषेतील हे फलक काढले असल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT