नोएडा/मुंबई : चाकूरकरांच्या दोन नातींनी दिल्लीत आपल्या मराठवाड्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. दिल्लीत कोरोनाच्या संकटात अडकलेल्या हजारो लोकांना पोटभर अन्न देत या दोघींनी मदत करत लोकांचे आशिर्वाद घेतले. सुरुवातीला दोन लोकांसाठी सुरु केलेला हा उपक्रम आता हजारो लोकांपर्यंत पोहचत आहे. चाकूरकरांच्या दोन नातींनी उचललेलं हे पाऊल तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणा देणारे ठरले आहे.
देशात कोरोना संकटाने हाहाकार उडवला आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या, परराज्यातून देशाच्या विविध राज्यांमध्ये अडकलेल्या कष्टकरी, मजुरांचे हाल व्हायला लागले. त्यांच्यासाठी अनेक सामजिक संस्था, संघटना पुढे सरसावल्या, अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तु आणि अन्न पाकीटे पुरवत गरीबांची काळजी वाहिली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कामात देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या दिल्लीच्या नोएडा भागात राहणाऱ्या रुद्राली आणि ऋषीका या नातींचे नाव देखील जोडावे लागेल.
या दोघी बहिणी एकेदिवशी काम आटोपून घरी जात असतांना त्यांना उत्तर प्रदेशाकडे पायी निघालेले मजुर, कष्टकरी दिसले. या लोकांची दोघींनी आस्थेवाईकपणे चौकशी केली, तेव्हा असे लक्षात आले, की ही माणसे उपाशी पोटीच शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला निघाली होती. तेव्हा या दोघींनी आपल्या मित्राच्या मदतीने या भुकेल्या लोकांच्या दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली.
सुरुवातीला काही मोजकी लोक आहेत असे वाटले, पण ही संख्या हजारोंच्या घरात असल्याचे रुद्राली आणि ऋषीका यांच्या लक्षात आले. त्यानंतर या दोघींनी मदतीचा ओघ वाढवण्याचा निर्णय घेत नोएडामधल्या सेक्टर 36 मध्ये एक तंबू उभारून मोठ्या पध्दतीने अन्नशिजवून लोकांना खायाला देण्याचे काम सुरु केले. येणारे जाणारे, माहिती मिळालेले, वेगेवेगळ्या राज्यात जाणारे लोक या तंबूमध्ये जेवण करून समाधानाने चाकूरकर भगिनींना आशिर्वाद देऊन पुढच्या प्रवासाला निघायचे.
गरजूंची संख्या जसजशी वाढत गेली, तशी तंबूंची संख्या ही वाढली. नोएडाच्या अनेक भागात अन्नछत्र सुरू झाले. आपल्या साई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्नवाटपाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अन्नदानाच्या कामासाठी पैसाही उभारला गेला. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक हातांनी पुढाकार घेतला. फिजिकल डिस्टन्स आणि प्रत्येकापर्यंत अन्न पोहचवण्यात अडचणी येऊ लागल्या तेव्हा, गरजूंना थेट अन्नधान्य पुरवण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून हा उपक्रम नोएडात सातत्याने सुरु आहे.
जिथे गरज असले तिथे ट्रकने सकाळीच धान्य पोहचवण्याची व्यवस्था केली जाते. मराठवाड्याचा भाग जरी दृष्काळी असला तरी गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करण्याची संस्कृती देशाच्या राजधानीत रुद्राली आणि ऋषीका या दोन मराठवाड्यातील बहिणींनी जपली. साधू संतांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या मराठवाड्याच्या या संस्कृतीचं आगळवेगळ दर्शन कोरोनाच्या संकटात दिल्लीकरांना झाले. या दोन्ही बहिणीच्या आणि त्यांच्या मित्रांच्या पुढाकारातून आज अनेकांना दोन वेळचं धान्य मिळत आहे, त्यांची चूल पेटत आहे. रुद्राली आणि ऋषीका या दोघींनी उचललेले पाऊल तरुणाईसाठी एक आदर्श बनले आहे.
वेगवेगळ्या कंपन्या आणि दानशूरांच्या माध्यमातून दाळ, हळद, तेल, पीठ, चहापत्ती, बिस्कीट अशा वस्तूंच्या किटस् तयार करून त्या गरजूंपर्यंत पोहचवल्या जात आहे. आता केवळ नोएडा आणि दिल्लीमधूनच नाही तर अलिगढ, त्रिपूरा, केरळ, या राज्यांमधून देखील मदतीसाठी या दोन्ही बहिणींना फोन येत आहेत. गरजूपर्यंत धान्य पोहचवण्याच्या कामी या दोन बहिणींना दामिनी दत्ता, हर्ष , प्रतिक व्दिवेदी, तान्या अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
साई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना अनेक लोक मदतही करत आहे. राजकारणात मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे एक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून देखील बघितले जाते. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा वारसा त्यांच्या दोन्ही नाती देखील समर्थपणे पुढे चालवत आहेत. लातूर आणि मराठवाड्यात त्यांच्या या कामाचे खूप कौतुक होत आहे.
रुद्राली आणि ऋषीकांच्या आई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आपल्या दोन्ही मुलीबद्दल बोलतांना म्हणाल्या, मी माझ्याकडून या कामासाठी पैसे देऊन पहिल्यांदा सुरुवात केली. आता ते काम सगळ्यांच्या मदतीने खूप मोठ झालं. सर्वसामान्याला त्याचा खूप फायदा होतो. टीमवर्कमुळे या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. या दोन्ही बहिणींच्या कल्पनेतून उभी राहिलेली ही चळवळ व्यापक कशी झाली? याची माहिती ३० मेला सायंकाळी साडेसात वाजता सकाळ मीडिया ग्रुपच्या ‘यिनबझ’ या पेजवर लाईव्ह येऊन रुद्राली आणि ऋषीका देणार आहेत.
आजोबांनाही कौतुक..
माझ्या दोन्ही नाती सामाजिक कार्यात रूची घेऊन खूप चांगल काम करतात, याचा मला आनंद आहे. तुम्ही हे काम करा, हे मी किंवा घरातून कुणीही त्यांना सांगितलं नाही. खरतर काम सुरु झाल्यावर त्यांनी मला याबद्दल सांगितलं. त्यांना मदत मिळते आणि अनेक माणसे त्यांच्यासोबत जोडल्या गेले आहेत. या दोघींचे गरजूसाठी सुरु केलेले हे काम कौतूकास पात्र असल्याच्या भावना त्यांचे आजोबा व माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
ही मोहीम लोकचळवळ झाली..
तर ज्या गरजूंना धान्य लागते त्या प्रत्येकाकडे आम्हा दोघा बहिणींचा नंबर आहे. आम्हाला कधी वाटलंही नव्हत की आम्ही इतक्या लोकांपर्यंत पोहोचू पण या कामाला खूप मोठी गती मिळाली असल्याचे ॲड. रुद्राली पाटील चाकूरकर यांनी म्हटले आहे. आमची चळवळ वाढवण्यात सोशल मीडियाचं मोठ योगदान आहे. निस्वार्थी भावनेतून आमच्यासोबत अनेक लोक जोडलेले आहेत. आमचं फाऊंडेशन आहे, पण आता नोएडात आमची ही चळवळ लोक चळवळ बनली असल्याचे ऋषीका पाटील चाकूरकर यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.