Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal : अजित पवारांचे मंत्रिमंडळ 'असं' असणार ! छगन भुजबळांनी रंगवलं चित्रं...

Ajit Pawar NCP : न्यायालयीन लढाईत अजित पवार गटाचा विजय होणारच

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : कुणाची इच्छा असो वा नसो, मात्र जनतेच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा आहेत. अजित पवारांच्या मंत्रिमंडळात सर्व समाजाला समान संधी असणार आहे. यात महिलाही मागे नसतील. राज्याला तडफदार मुख्यमंत्री देण्यासाठी आपल्याला कामाला लागावे लागेल, असे सांगत मंत्री छगन भुजबळांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील सरकारचे स्वप्न रंगवले. ते कर्जत येथील अजित पवार गटाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.

अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असेल, तर मैदानात उतरून काम करावे लागणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'पुढील मुख्यमंत्रीअजितदादा व्हावेत, हेच जनतेच्या मनात आहे. त्यासाठी आता काम करावे लागेल. फक्त कार्यालयात येण्याऐवजी रस्त्यावर उतरावे लागेल. सर्वांना बरोबर घ्यावे लागेल. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे लागेल. अडचणीतील लोकांना मदत केली तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखणार नाही. हेच जनतेच्या मनात आहे,' असे म्हणत भुजबळांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावला.

'आपण राजकारणातील विरोधक आहोत, शत्रू नाही. त्यामुळे अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कुणाचीही हरकत नसावी. चांगले बोलायला काय हरकत आहे. मात्र, पूर्वीच्या सहकाऱ्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना अजितदादांना शुभेच्छा द्यायला नकोसे वाटते. त्यांनी वेगळ्या पद्धतीने शुभेच्या दिल्या. हा एवढा दुरावा का, कशासाठी ? असे म्हणत भुजबळांनी नाव न घेता पवारांना लक्ष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'कुणाला काहीही वाटत असले तरी लोकांच्या शुभेच्छा आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे स्वस्थ बसून चालणार नाही. जास्तीत जास्त खासदार, आमदार आपल्याला निवडून आणावे लागतील. राज्यातील सर्व समाजाला बरोबर घ्यावे लागले. अजितदादांच्या मंत्रिमंडळात सर्व समाजांना स्थान मिळणार आहे. त्यात महिलांचाही समावेश असणार आहे. त्यांच्याकडे सर्वसमावेशक विचारदृष्टी आहे. तुमच्या नेतृत्वातही काम केले. आता अजितदादांच्या नेतृत्वात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही मागे हटणार नाही,' असाही निर्धार भुजबळांनी केला.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पवारांनी पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर दावा ठोकला. तसेच मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे जाहीर केले. आता निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी सुरू आहे. दरम्यान, शरद पवारांच्या वतीने बाजू मांडण्यात आली आहे, तर सोमवारपासून अजित पवार गटाची बाजू मांडण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, 'आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे. जनता कुणाबरोबर आहे, हे सिद्ध होत आहे. मात्र, तारीख पे तारीख चलता है. निकाल लागेल आणि न्याय आपल्याच बाजूने होईल. यात विजय आपलाच होईल,' असा दावाही भुजबळांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT