Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal News : 'हो, मी दोन वेळा खोटं बोललो'; कबुली देत भुजबळांचं पवारांना प्रत्युत्तर

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपण एकदा नव्हे तर दोन वेळा खोटं बोललो, अशी जाहीर कबुलीही भुजबळ यांनी दिली आहे. पण त्यांनी शरद पवारांचा दावाही फेटाळून लावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित फुटीनंतर दोन्ही गटांतील राजकारण रंगलं असून, वेगवेगळे दावे केले जात आहेत. आता २०१९ मधील प्रसंगावरून वाद सुरू झाला आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्याबाबत सकारात्मक होती, असा दावा अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा दावा फेटाळून लावला. आणि छगन भुजबळ हे खोटं बोलत असल्याचं म्हटलं. यावर आता छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युतीबाबत भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाली होती, असं छगन भुजबळ यापूर्वी म्हणाले होते, पण भुजबळ खोटं बोलत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही छगन भुजबळ हे खोटं बोलत असल्याचा दावा केला होता. आता शरद पवार आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली बाजू मांडली आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळी पडद्याआड काय झालं, हे राऊत यांना काय माहिती? आता आम्ही जे लोक आहोत आम्हाला माहिती आहे. त्यावेळी काय ठरलं होतं ते', असं म्हणत छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

'शरद पवारसाहेब खोटं बोलताहेत असं मी म्हणू शकत नाही. कारण ते पवारसाहेब आहेत, पण असं ठरलं होतं. म्हणून पवारसाहेब संसदेत जाऊन त्यावेळी पंतप्रधान मोदींना भेटले होते. ही बातमी वृत्तपत्रांमध्ये आली होती. आम्हाला शक्य नाही, असं त्यावेळी शरद पवार यांनी मोदींना सांगितलं होतं.

आम्हाला तुमच्या बरोबर येणं शक्य नाही असं पवारसाहेब बोलले होते. म्हणजेच याआधी तुमच्यासोबत येणार असंच सांगितलं होतं. म्हणून तुम्ही बोलायला गेलात. काँग्रेसचं कोण बोलायला गेलं नाही, तुमच्यासोबत. तुम्ही कसे गेलात त्यांना सांगायला?', असा प्रतिप्रश्न छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला आहे.

मी दोन वेळा खोटं बोललो- भुजबळ

'मी असं कधीच खोटं बोलणार नाही. मी खोटं बोललो. दोन वेळा खोटं बोललो. मला राजकारणात खोटं बोलता येत नाही. ज्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडायचं होतंं, त्यावेळी मी बाळासाहेबांशी खोटं बोललो. मी शिवसेनेतू बाहेर पडणार याची बातमी वृत्तपत्रातून आल्यावर बाळासाहेबांचा मला फोन आला होता.

त्यावेळी मी बाळासाहेबांना सांगितलं असं काही होणार नाही. तेव्हा पहिल्यांदा मी खोटं बोललो. आणि आता अजित पवारांसोबत जात असताना पवारसाहेबांचा फोन आला. त्यावेळीही मी खोटं बोललो', असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

'या घटना घडायच्या असतील तर त्या अशा उघड करून चालत नाहीत. म्हणून नाईलाजाने खोटं बोलावं लागलं. दोन वेळा खोटं बोललो हे मी कबूल केलेलं आहे. बाकी जे मी बोललो ते शंभर टक्के सत्य आहे', असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT