Eknath Shinde, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

MLA Jayant Patil News : मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांची 'ती' प्रमुख मागणी फेटाळली ? जयंत पाटलांच्या दाव्यामुळे पेच वाढला

Deepak Kulkarni

Mumbai News : मराठा आरक्षणावरून राज्यात भडका उडाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षांमधील अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. परंतु,या बैठकीला स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती अनुपस्थित राहिले.

यावरून एकीकडे उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटलांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाला लागलेले हिंसक वळण आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बेमुदत उपोषणाच्या धर्तीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालं. तसंच जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन केलं. आता या बैठकीवर शेकापचे नेते जयंत पाटलांनी मोठं विधान केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांची मुख्य मागणी फेटाळल्याची माहिती दिली.

जयंत पाटील म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधला. त्यांनी या वेळी बैठकीतील चर्चेवर भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत वेगळं असं काहीही घडलेलं नाही, आहे तीच परिस्थिती आहे. फक्त शांतता राखा, उपोषण मागे घ्या हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच कुणबीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही. याचवेळी आरक्षणासाठी आयोग काम करत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं मराठा आंदोलकांना आवाहन...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत मराठा समाजाला भावनिक साद घातली. ते म्हणाले, मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्यावा. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, सहकार्य करावं,” असं मुख्यमंत्री म्हणाले. याचवेळी आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा. सर्वसामान्य माणसाला अविश्वास वाटता कामा नये. सकल मराठा समाजाने सहकार्य करावं,” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

संभाजीराजेंचा सरकारवर हल्लाबोल...

मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर त्यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र संभाजीराजे छत्रपती यांनी सोडले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT