Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

केंद्राने सुरक्षा दिलेल्या भाजप नेत्यांना ठाकरेंनी टिनपाट, टमरेल म्हणून हिणवले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भाजपवर चौफेर टीका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) काळात ७ पैशांनी पेट्रोल महागले होते. तेव्हा भाजपने (BJP) संसदेवर मोर्चा काढला होता. त्यात अटल बिहारी वाजपेयी संसदेत बैलगाडीने गेले होते. मग आता भाजपचा तो संवेदनशीलपणा कुठे गेला? ही जर बाळासाहेबांची शिवसेना नाही म्हणता मग, तर तुमचा भाजपतरी अटलजींचा राहिलाय का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. (Uddhav Thackeray Latest News)

उद्धव ठाकरे मुंबईमध्ये शिवसेना (Shiv Sena) मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. त्यातही शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या नेत्यांचा त्यांनी समाचार घेतला. किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर, राणा दांपत्य या नेत्यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली. त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. टिनपाटांना झेडप्लस सुरक्षा देत आहात. तिथे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही. मात्र, इथे भोक पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा! कुणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लसऍ काय बापाचा माल आहे? लोकांचा पैसा आहे. ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना दिली नाही. ही असली गळकी टिनपाटे काय उपयोगाची. टिनपाट सभ्य शब्द बोललो, टमरेलच बोलायचे होते, अशा शब्दांत या नेत्यांची खिल्ली उडवली.

शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले. तरी हृदयातले हिंदुत्व आम्ही सोडलेले नाही. हे मी विधानसभेतही बोललो आहे. सत्ता असो वा नसो, आम्हाला पर्वा नाही. आमचे हिंदुत्व हे तकलादू नाही, ते खरे आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर वाटले का? कधी नेसले, कधी सोडले, असाही तर्क त्यांनी मांडला.

आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड पणे गेलो. तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला. तुम्ही केले तर पवित्र, आम्ही केले तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली त्याचे काय. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसून गुणगान केले असते असे वाटते का? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संभाजीनगरमध्ये ओवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोक टेकवून आला आहे. यांची `ए` टीम, `बी` टीम, `सी `टीम काम करते. कुणालातरी औरंगजेबच्या थडग्यावर पाठवायचे, कुणाच्यातरी हातात भोंगा द्यायचा आणि कुणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायची मजा घेत बसायचे. म्हणजे काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार, आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचे शौर्य, असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना नाव न घेता मुख्यमंत्री यांनी लगावला.

कश्मिरी पंडित म्हणतात आमचा बळीचा बकरा केला जात आहे. हे काश्मिरी फाईल्सचे पुढचे पान आहे का, राहुल भटची हत्या झाली. त्या कार्यालयासमोर हनुमान चालीसा वाचायची का? घंटा वाजवायचा? आपण खोटे बोलू शकत नाही. खोटे बोलणे त्यांच्या हिंदुत्वात बसते. आपल्या हिंदुत्वात बसत नाही, हा दोघांच्या हिंदुत्वात फरक आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत यांचे चिंतन, कुंथन चाललेले असते. प्रमोद महाजन होते, तेव्हा तिथे जावे असे वाटत होते. आता प्रश्न पडतो, की त्या प्रबोधिनीत हे तुम्ही शिकवता का? या प्रबोधिनीत जे शिकले, ते कुठे गेले असाही सवाल त्यांनी विचारला.

फडणविसांबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की तुमचे वय किती तुम्ही बोलता किती. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले. बाबरी तर पाडली नाहीच. तुम्ही तिकडे गेला असातत आणि चढण्याचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, असा टोला त्यांनी लगावला. तुमचे विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. मनोरुग्ण आहेत हे लोक, एका बाईने शरद पवार यांच्यावर टीका केली. तुमच्यावर काही संस्कार होतात की नाही. सुसंस्कृतपणा आपण जपले पाहिजे. या सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT