4PravinDarekar_140719_F.jpg
4PravinDarekar_140719_F.jpg 
मुंबई

मुख्यमंत्री सर्वाधिक काळ घरातच ! सरकारच्या विस्कळीतपणामुळे पत्रकाराचा बळी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न जाणारे मुख्यमंत्री असा उध्दव ठाकरे यांचा उल्लेख होईल, अशी उपरोधिक टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.

पत्रकार रायकर यांचा मृत्यू झाला, मग आरोग्य यंत्रणेचे काय झाले, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पत्रकाराला जीव गमवावा लागला, राज्यात इतका विस्कळीतपणा आला असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे, कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले, पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ नाही. काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत. क्वचित अपवाद म्हणून एखाद्या ठिकाणी गेले असतील, पण सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य चालिवता येत नाही, यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, अशी टिकाही दरेकर यांनी केली.

एवढे महिने राज्य सांभाळूनही राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा यायला तयार नाहीत. अन्य सर्व मंत्री व नेते मंत्रालयात असले तरीही मुख्यमंत्री मुंबईत असूनही घरूनच व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतात. पत्रकार रायकर यांचा आज मृत्यू झाला, मग आरोग्य यंत्रणेचे काय झाले?  मुख्यमंत्र्यांनी पुण्याला जाऊन मोठमोठ्या घोषणा करून तेथे जंबो कोविड सेंटर सुरु केले, पण रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, बेड उपलब्ध झाला नाही, त्यामुळे पत्रकाराला नाहक जीव गमवावा लागला. राज्यात कधी नव्हे इतका विस्कळीतपणा या सरकारच्या काळात आला आहे, अशी टीकेची झोडही दरेकर यांनी उठवली. 

एका बाजूला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत, आपण स्वतः देखील विविध प्रश्नांवर राज्यात वणवण फिरत आहोत, ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा काही ठिकाणी जाऊन आले. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही आणि हे राज्याच्या हिताचे नाही, असेही दरेकर यांनी दाखवून दिले.


Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT