Thane News : ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. मात्र, याच प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपचा तीव्र विरोध झुगारून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यामुळे ठाण्यातील सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
क्लस्टर प्रकल्पाला आमचा विरोध नसून केवळ स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या घाईगडबडीवर आणि प्रक्रियेवर आक्षेप असल्याचे भाजप नगरसेवकांनी स्पष्ट केले. कंपनीची गरज, रचना, अधिकार, नियमावली आणि संचालकांची नियुक्ती याबाबत प्रशासनाने पुरेशी माहिती दिलेली नाही, असा आरोप भाजपने केला.
महापालिका ही नागरिकांना सेवा देणारी संस्था आहे. स्वतंत्र कंपनीमुळे मध्यस्थी किंवा 'ब्रोकरेज'ची नवीन व्यवस्था निर्माण होऊ नये, अशी भीती भाजप नगरसेवकांनी व्यक्त केली.
पालिका आयुक्तांच्या अधिकारात काम होऊ शकत असताना नवीन कंपनी कशासाठी? यामुळे क्लस्टरचा वेग वाढण्याऐवजी तो मंदावेल, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. तसेच जीआयएमएस (GIMS) सर्वेक्षणावर मोठा खर्च होऊनही प्रकल्प पुढे सरकला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सहाय्यक संचालक (नगररचना) कुणाल मुळे यांनी प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की, "विशेष प्रयोजन कंपनी (SPC) स्थापन करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल. मंजुरीनंतर कंपनीची नोंदणी व संचालकांची नियुक्ती होईल."
सध्या सिडको, महाप्रीत आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून काही प्रकल्प सुरू आहेत.पालिकेच्या स्वतःच्या कंपनीमुळे या कामांना अधिक गती मिळेल आणि भविष्यात पालिकेला महसूलही मिळेल, असा दावा प्रशासनाने केला. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही भाजपचा विरोध कायम राहिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार म्हणाले, "कंपनी स्थापनेपूर्वी विशेष महासभा घेण्याची गरज होती. क्लस्टर प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र अशा महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्यास तीव्र विरोध केला जाईल.
भाजप नगरसेवक अमित सरय्या म्हणाले, "कंपनी नेमकी कोणत्या पद्धतीने काम करणार? तिचे संचालक कोण आणि त्यांची पात्रता काय? याविषयी कसलीही माहिती न देता प्रस्ताव घाईघाईने मंजूर करणे अयोग्य आहे. प्रकल्पाच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये यासाठी आधी सविस्तर चर्चा व्हायला हवी होती."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.