<div class="paragraphs"><p>Ajit Pawar-Uddhav Thackeray</p></div>

Ajit Pawar-Uddhav Thackeray

 
sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का, असे म्हणणाऱ्या अजितदादांचा शब्द फोल ठरला...

Yogesh Kute

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 'फिट' असल्याचे सांगून ते विधीमंडळ अधिवेशनाला (Assembly Winter session 2021) हमखास येणार असल्याची जाहीर हमी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती खरी; मात्र पाच दिवसांच्या अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले तरी मुख्यमंत्री ठाकरे विधान भवनाकडे फिरले नाहीत. परिणामी, मुख्यमंत्र्यांविनाच हे अधिवेशन पार पडले. त्यांच्या उपस्थितीबाबत लिहून देऊ का, अशी पत्रकारांनाच विचारणा करणारे पवार यांचा शब्द काही खरा ठरला नाही. मुख्यमंत्र्यांविना पार पडलेले राज्याच्या विधीमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन ठरले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्याने ते सध्या विश्रांती घेत आहेत. परंतु, गेल्या ५० हून अधिक दिवस मुख्यमंत्री शासकीय कामकाजात नसल्याने विरोधकांनी रान उठवले होते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना ‘टार्गेट’ करीत, त्यांच्या अनुपस्थितीकडे बोट दाखवले होते. त्याआधी पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरे आहे. अधिवेशन येणार आहेत, असा मुख्यमंत्र्यांचा निरोप असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत गेल्या मंगळवारी (२२) सांगितले होते. तरीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर "मुख्यमंत्री येणार आहेत. हे लिहून देऊ का," असा प्रतिप्रश्न विचारत पत्रकारांनाच गप्प केले होते.

मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार म्हणून प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यांचा त्यांच्या मानेला त्रास होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने वर्षा बंगला ते विधान भवनापर्यंतच्या रस्ते कामही हाती घेतले होते. मात्र, मुख्यमंत्री अधिवेशनाला नेमके कधी येणार हे सांगितले जात नव्हते. त्यावरूनही आक्रमक झालेल्या विरोधकांनी 'हाऊस मे आओ', 'दादा काय म्हणाले ? मुख्यमंत्र्यांना शोधून आणा,` अशा घोषणा देत मुख्यमंत्री येत नसल्याकडे लक्ष वेधले. त्यात सत्ताधारी-विरोधकांत टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे मंगळवारी विधान भवनात दिसल्याने मुख्यमंत्री हजेरी लावण्याची चर्चा होती. मात्र, त्याही दिवशी मुख्यमंत्री आले नाहीत.

मुख्यमंत्र्यांवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांमधील वाद वैयक्तिक पातळीवरपर्यंत घसरल्याचे दिसून आले. त्यानंतरही मुख्यमंत्री येणार असल्याचे ठाकरे सरकारमधील मंत्री, आमदार सांगत होते. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि तेव्हा ते मतदानासाठी येतील, असा अंदाज होता. मात्र, त्यामुळे मंगळवारी दिवसभर त्यांची प्रतीक्षा होती. निवडणूक रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री येणार नसल्याचे संकेत मिळाले आणि अधिवेशन आटोपले तरी, मुख्यमंत्री ठाकरे विधान भवनात आले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT