Zeeshan Siddique Sarkarnama
मुंबई

Congress News : काँग्रेसच्या बैठकीला बोलावले जात नाही; हायकमांडकडे आमदार झिशान सिद्दिकी करणार तक्रार

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षांकडून तयारी जोरात सुरु आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र आता चांगलीच आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप ठरवण्यापूर्वीच त्यांनी रविवारी बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीस काँग्रेसचे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी यांना बोलवले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह दिग्ग्ज मंडळींच्या उपस्थित बैठकी पार पडली. या बैठकीत काँग्रेसची निवडणुकीबाबत रणनीती ठरली आहे. त्यातच या बैठकीस ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी काँग्रेस (Congress) नेत्यांची भेट घेतल्याने वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Congress News)

वांद्रे पूर्वची ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर तो काँग्रेस कार्यकर्त्यांचा पराभव असणार आहे. शिवसेना ठाकरे गट म्हणेल तेच आम्ही करणार, तर तसं कसं चालेल? माझ्याविरुद्ध अनेक वर्षांपासून षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेसचे काही नेतेही मला बाजूला करण्यात धन्यता मानत आहेत. शिवसेनेने उबाठा उमेदवाराचा पराभव करून ही जागा जिंकली, असेही आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले.

काँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसापासून सातत्याने ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई भेट घेत आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्याबाबत अनेकवेळा तक्रार केली आहे. रविवारी हॉटेलमध्ये वरुण सरदेसाई आणि काँग्रेस नेत्यांमधील या भेटीची तक्रारही मी काँग्रेसच्या हायकमांडकडे करणार आहे, असे झिशान सिद्दिकी म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून मला कोणत्याही बैठकीला बोलावले जात नाही. पण आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करतो. वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसचा एक विद्यमान आमदार असला तरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते किंवा चर्चा सुरू झाली. तर काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांनी बाहेर येऊन ही जागा आमची आहे, आणि आम्हीच लढू, असे सांगावे लागणार आहे, असेही झिशान सिद्दिकी यावेळी बोलताना म्हणाले.

त्यामुळे आता झिशान सिद्दिकी यांनी तक्रार केली तर काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT