Congress leader Naseem Khan
Congress leader Naseem Khan  Sarkarnama
मुंबई

पक्षाचा आदेश आला अन् लगेचच बड्या नेत्यानं सोडलं पद

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रेसनं (Congress) 'एक व्यक्ती, एक पद' आणि 'एक कुटुबं, एक तिकीट' असं नवीन धोरण स्वीकारलं आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधी याचा फटका एका काँग्रेस आमदाराला बसला होता. त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. आता पक्षाचे नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी स्वत:हून त्यांच्याकडील अतिरिक्त पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातून अशा प्रकारे राजीनामा देणारे ते पहिले पदाधिकारी ठरले आहेत.

उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरातील घोषणापत्रात असलेल्या 'एक व्यक्ती, एक पद' या घोषणेच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी यानुसार त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या पदाचा राजीनामा दिला आहे. खान यांच्याकडं मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचं अध्यक्षपद होतं. त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे. 'एक व्यक्ती, एक पद' या धोरणानुसार राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.

काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या बैठकीत खान यांनी राजीनाम्याची घोषणा केली. 'एक व्यक्ती, एक पद' धोरणानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान हे पहिले पदाधिकारी ठरले आहेत. राज्यस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्यात 'एक व्यक्ती, एक पद', 'एक कुटुंब, एक तिकीट` असा नवा संकल्प करण्यात आला. यानुसार राज्यासह देश पातळीवर काँग्रेसमध्ये फेरबदल सुरू झाले आहेत.

पहिला फटका विदर्भातील आमदाराला

या निर्णयाचा पहिला फटका विधान परिषदेचे आमदार तथा यवतमाळ काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना बसला होता. त्यांच्याकडे आधीच पाच पदे असताना महाराष्ट्र प्रदेश कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यावरून पक्षात नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर झालेल्या प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आमदार वजाहत मिर्झा यांची नियुक्ती अयोग्य असल्याचं म्हटलं होते. त्यांना राजीनामा द्यावा अथवा मला नियुक्ती रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठीकडे पाठवावा लागेल, अशी भूमिका घेतली होती. या घडामोडीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर तातडीनं कार्यवाही करत जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मिर्झा यांना मुक्त केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT