Mumbai News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दोन जागेवरील उमेदवाराची घोषणा गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. गुरुवारी संध्यकाळी त्या उमेदवारी घोषणेला मुहूर्त लागला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इच्छुक असलेल्या मंडळीतील वादावर पडदा पडेल असे वाटत होते. मात्र, हा वाद वाढल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस (Congress) पक्षाने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केलीय. मात्र, वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान (Naseem Khan) नाराज झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. (Naseem Khan Resign News)
दरम्यान, मला तयारी करायला सांगितली होती, मात्र अचानक काय झाले की, मला उमेदवारी दिली नाही, असा सवाल नसीम खान यांनी केला. उत्तर मध्य मुंबईतून मला तयारी करायला सांगितली होती. मात्र, अचानक काय झालं मला माहित नाही. माझी नाराजी आहे.
महाराष्ट्रात एकही काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार नाही. मतदान मुस्लिम समाजाचे पाहिजे मग उमेदवार का नाही, असा प्रश्न समाज मला विचारेल त्यांना मी काय सांगणार? उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की, नाही याचा निर्णय मी घेईल. माझी जी काही नाराजी आहे, ती मी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहे, असेही लोकसभा उमेदवारीबाबत बोलताना नसीम खान म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडी वर्षा गायकवाड यांना विजयी करण्यासाठी एकजूट झाली असताना काँग्रेसमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. वर्षा गायकवाड नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड यांना दिल्लीत पाठवणार आहोत, असे प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी सांगितले. देशात हुकूमशाही येऊ देणार नाही. राज्यघटना बदलू देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.